पोलिसांना घेराव घालून नातेवाइकांनीच अल्पवयीन नवरा-नवरीस पळवून लावले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 01:08 PM2024-10-19T13:08:58+5:302024-10-19T13:09:07+5:30
चोवीस तासांत शहरात दोन बालविवाह उघडकीस
छत्रपती संभाजीनगर : बालविवाह थांबवण्यासाठी गेलेल्या दामिनी पथकाला नातेवाइकांनी घेराव घालून अल्पवयीन नवरीसह नवरदेवाला दुचाकीवरून पळवून लावले. गुरुवारी सायंकाळी ६ वाजता चिकलठाण्यातील ठाकूर सभागृहात ही धक्कादायक घटना घडली.
दामिनीच्या प्रमुख कांचन मिरधे यांना चिकलठाण्यात बालविवाह होत असल्याची माहिती मिळाली होती. सायंकाळी ५ वाजता जिल्हा महिला बालविकास अधिकारी आम्रपाली बोर्डे, नितेश दुर्वे यांच्यासह दामिनीच्या अंमलदार कल्पना खरात, सुधाकर पवार, सोनाली निकम, मनीषा बनसोडे यांनी कार्यालयात धाव घेतली. तोपर्यंत बालविवाह पार पडलेला होता. नवदाम्पत्याचे मोठ्या आनंदात फोटोसेशनही सुरू होते. वऱ्हाड्यांची जेवणाची पंगत बसली होती. अचानक पोलिस आल्याचे दिसताच कार्यालयात एकच धावपळ उडाली. पोलिसांनी त्यांना समजावून सांगत मुला मुलीच्या आधार कार्डची मागणी केली. पालकांनी मुलीचे १२ मार्च २००५ जन्मतारीख असलेले आधार कार्ड दाखवले. मात्र, बालविकास अधिकाऱ्यांना आधार कार्डावर संशय आला. त्यांनी मुलीच्या टीसीची मागणी केली. तोपर्यंत नातेवाइकांनी गोंधळ सुरू केला होता.
चहूबाजूने घेरले अन् नवरा नवरी पळाले
नातेवाइकांनी पोलिस व बालविकास अधिकाऱ्यांना चहूबाजूने घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती केली. पोलिस त्यांना समजावून सांगत असतानाच काहींनी नवरा नवरीला कार्यालयाबाहेर नेत दुचाकीवरून पळवून लावले. दामिनी पथकाने नियंत्रण कक्षाला मदत मागितली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता.
नोटीस बजावली
शुक्रवारी सायंकाळी जुना बाजारात देखील एका १७ वर्षीय मुलीच्या लग्नाची तयारी सुरू होती. गरिबीचे कारण देत कुटुंबाने मुलीचे लग्न २२ वर्षीय मुलासोबत ठरवले होते. दामिनी पथकाने तत्काळ धाव घेतली. एका छोट्या हॉलमध्ये लग्नाची तयारी सुरू होती. पथकाने पालकांना बोलावून लग्न थांबवून सोमवारी बाल कल्याण समितीसमोर हजर राहण्याची नोटीस बजावली.