कोरोनामुळे औरंगाबाद जिल्ह्यात लावलेले कठोर निर्बंध १ जूनपासून शिथिल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:05 AM2021-05-31T04:05:26+5:302021-05-31T04:05:26+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या घटली असून, शहराचा ‘पॉझिटिव्हिटी रेट’ केवळ दोन टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात ‘ब्रेक ...
औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या घटली असून, शहराचा ‘पॉझिटिव्हिटी रेट’ केवळ दोन टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत लागू केलेले कठोर निर्बंध १ जूनपासून शिथिल करा, अशी मागणी रविवारी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आ. सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटल्यानुसार, राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता ३१ मे पर्यंत ‘लॉकडाऊन’ केेले होते. मात्र, १ जूनपासून ‘लॉकडाऊन’ पुन्हा वाढविला जाणार का? यावरून व्यापारी, छोटे-मोठे व्यावसायिक व सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम आहे. महाविकास आघाडी सरकारने राज्यात राबविलेल्या कोरोना प्रतिबंधक मोहिमा जिल्ह्यात यशस्वी झाल्या. नागरिकांनी दिलेल्या उत्तम प्रतिसादामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात यश आले.
मागील दोन महिन्यांपासून अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद आहेत. त्यामुळे छोटे-मोठे व्यावसायिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले. कमाई काहीच नाही, परंतु त्यांचा दुकानांचा किराया, वीज बिल, कर भरण्यासह अन्य खर्च सुरूच आहेत. त्यामुळे कोरोनाविषयक नियमांचे पालन करून दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांबरोबरच कामगारांकडून केली जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचेदेखील प्रचंड हाल होत आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात १ जूनपासून लावलेले कठोर निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.