'मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते'; अशा ओळी लिहून लग्न सोहळ्याआधीच वधूपित्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 06:51 PM2018-12-17T18:51:51+5:302018-12-18T10:25:32+5:30
मुलीच्या लग्नसमारंभप्रसंगीच राहत्या घरी वधूपित्याची गळफास घेऊन आत्महत्या.
औरंगाबाद : ' इतकेच मला जातांना सरणावर कळले होते; मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते' अशा ओळी लिहून ठेवून वधूपित्याने मुलीच्या लग्नसमारंभप्रसंगीच राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना धूत हॉस्पिटल समोरील म्हाडा कॉलनीत घडली. वधूपित्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
मनजीत रायभान कोळेकर (वय ५०,रा. म्हाडा कॉलनी) असे मृत वधूपित्याचे नाव आहे. याविषयी एमआयडीसी सिडको पोलसांनी सांगितले की, मनजीत यांच्या मुलीचा विवाह सोमवारी (दि.१७) दुपारी १२.०१ वाजता बीड बायपास वरील एका लॉन्सवर आयोजित करण्यात आला होता. या विवाहाची संपूर्ण तयारी कोळेकर कुटुंबांनी केली. वऱ्हाडी मंडळीही सकाळीच मंगलकार्यालयात दाखल झाले.
मनजीत यांनी वऱ्हाडींचे स्वागतही केले. मनजीत यांची पत्नी, मुलगा आणि वधूकन्येसह सर्व नातेवाईक विवाहस्थळ असलेल्या लॉन्सवर गेले होते. त्यामुळे कोळेकर यांच्या घराला कूलूप होती. लग्नसोहळ्याला अवघी काही मिनिटे उरली असताना साडेअकरा वाजेच्या सुमारास मी घरीजाऊन फेटा घेऊन येतो, असे नातेवाईकांना सांगून मनजीत हे मोटारसायकलने म्हाडा कॉलनीतील घरी आले. घरातील स्वयंपाकखोलीतील छताच्या हुकाला साडी बांधून त्यांनी आत्महत्या केली.
लग्नाचा मुहूर्त टळू द्यायचा नाही, हे त्यांनीच स्पष्टपणे बजावले होते. यामुळे ठरल्यावेळेनुसार वधु-वर लग्नासाठी समोरासमोर येऊन मंचावर विराजमान झाले. मात्र बराचवेळा झाला तरी मनजीत हे लग्नमंडपात परतले नाही. वधूपिता दिसत नसल्यामुळे त्यांचे नातेवाईक सारखा त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधत होते, मात्र ते फोन उचलत नव्हते. यामुळे काही वेळाने नातेवाईकांनी म्हाडा कॉलनतील त्यांच्या शेजाऱ्यांना फोन करून घरी जाऊन मनजीत यांना तातडीने विवाहस्थळी पाठव, असा निरोप दिला. त्यानंतर शेजारी राहणारा तरूण मनजीत यांच्या घरी गेला तेव्हा घराचे दार आतून बंद होते. यामुळे तरूणाने खिडकीतून डोकावून पाहिले असता, मनजीत यांनी पंख्याला गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. या घटनेची माहिती लगेच नातेवाईकांना आणि एमआयडीसी सिडको पोलिसांना कळविण्यात आली.
पत्नीची मागितली माफी
पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली आहे. यात मनजित यांनी पत्नीची माफी मागून ' इतकेच मला जातांना सरणावर कळले होते; मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते' या कवी सुरेश भट यांच्या सुप्रसिद्ध ओळी लिहून ठेवल्या आहेत. माझे देहदान करावे असेही त्यांनी नमूद केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.