मराठवाड्यासाठी घोषित ४५ हजार कोटींची श्वेतपत्रिका काढा; उद्धव ठाकरेंचे सरकारला आव्हान
By बापू सोळुंके | Published: February 13, 2024 10:51 AM2024-02-13T10:51:51+5:302024-02-13T11:11:44+5:30
महाराष्ट्रातून कराच्या माध्यमातून एक रुपया नेला जातो आणि आठ पैसे परत केले जातात. सगळे पैसे गुजरातला दिले जातात.
छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने येथे बैठक घेऊन मराठवाड्याला ४५ हजार कोटी रुपये दिल्याची घोषणा केली होती. या घोषणेला चार ते पाच महिने झाले. आतापर्यंत किती निधी खर्च केला आणि नव्याने किती योजना केल्या, याबाबत श्वेतपत्रिका काढा, असे जाहीर आव्हान शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिले. जनसंवाद यात्रेनिमित्त सोमवारी रात्री टीव्ही सेंटर येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. व्यासपीठावर शिवसेना नेते खा. संजय राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे आणि जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
ठाकरे म्हणाले, जनतेच्या मनातील चीड, संताप आणि उद्वेग पाहिला तर निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधात प्रचाराची गरज नाही, असे दिसते. या शहराचे नामकरण करून आपण शिवसेनाप्रमुखांनी दिलेले वचन पूर्ण केले. मंत्रिमंडळ बैठकीत शहराच्या नामांतराचा निर्णय घेतला तेव्हा गद्दारी करणारे दिल्लीत खुर्ची चाटत होते, त्यांनी माझ्याविरोधात गद्दारीच केली नाही, तर पाठीत वार केला. हा वार माझ्यावरच नव्हे, तर तुमच्यावरही झाला आहे. हा महाराष्ट्र फुले, शाहू, आंबेडकरांचा आहे. गद्दारांचा होऊ देणार नाही. छत्रपती संभाजीनगरची महापालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही, म्हणून समांतर योजनेचा महापालिकेचा हिस्सा राज्य सरकार देईल, असा निर्णय आपण घेतला होता. मात्र, आता मिंधे सरकारने पत्र पाठवून हा हिस्सा देण्यास नकार दिल्याचे कळविले. ही तर इथल्या जनतेची फसवणूक आहे. महाराष्ट्रातून कराच्या माध्यमातून एक रुपया नेला जातो आणि आठ पैसे परत केले जातात. सगळे पैसे गुजरातला दिले जातात. हा महाराष्ट्रावर अन्याय नाही का, असा सवालही ठाकरे यांनी केला. खा. संजय राऊत, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे यांचीही भाषणे झाली.
आमचे हिंदुत्व शिवरायांचे
आम्ही जातीवंत हिंदुत्ववादी आहोत. आमचे हिंदुत्व शिवरायांचे असून ते प्रत्येक घरातील चूल पेटविणारे आहे. तर, तुमचे नकली हिंदुत्व घरे पेटविणारे आहे. शिवरायांचा हा महाराष्ट्र तुमच्यापुढे झुकणार नाही, अशी टीका ठाकरे त्यांनी भाजपवर केली.
तुम्हाला इतरांचे नेते का लागतात?
भाजपने २०१४ साली ‘काँग्रेसमुक्त भारत’ अशी घोषणा केली होती. आज काय परिस्थिती आहे? भाजपच काँग्रेसव्याप्त झाली असून एक दिवस असा येईल की, भाजपचा अध्यक्षदेखील काँग्रेसचा असेल. ज्या अशोक चव्हाण यांच्यावर तुम्ही आरोप केला होता त्यांनाच घेताय? तुम्ही महाशक्ती असाल तर मग तुम्हाला इतर पक्षांतील नेत्यांची गरज का भासते, असा सवाल ठाकरे यांनी केला.
स्वामीनाथन आयोग कधी?
सध्या भारतरत्नाचा बाजार मांडलाय. स्वामीनाथन यांना भारतरत्न देताय, आनंद आहे. पण, शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशी कधी लागू करणार, असा सवाल ठाकरे यांनी केला. गेल्या दोन वर्षांत केंद्र सरकारने आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दमडीचीही मदत केली नाही, अशी टीका त्यांनी केली.