गुंठेवारी अधिकृत करण्यासाठी जूनपर्यंत संधी; पण फक्त निवासी बांधकामांना असणार सवलत
By मुजीब देवणीकर | Published: March 9, 2024 07:37 PM2024-03-09T19:37:11+5:302024-03-09T19:37:27+5:30
ही संधी फक्त जूनअखेरपर्यंतच राहणार आहे. त्यानंतर मनपा कोणाला सवलत देणार नाही.
छत्रपती संभाजीनगर : गुंठेवारी भागातील नागरिकांना शुक्रवारी मनपा प्रशासनाने मोठा दिलासा दिला. दोन हजार चौरस फुटांपर्यंतच्या निवासी बांधकामांना पन्नास टक्के बेटरमेंट चार्जेस भरून आपले घर अधिकृत करता येईल. ही संधी फक्त जूनअखेरपर्यंतच राहणार आहे. त्यानंतर मनपा कोणाला सवलत देणार नाही. गुंठेवारीसाठी १०० टक्के शुल्क भरावे लागतील.
शहराच्या आसपास ८० टक्के प्लॉट बाँड पेपरवर विक्री करण्यात आले. अनेक वर्षांपासून नागरिक अनधिकृत घरे बांधून राहत आहेत. मनपा त्यांच्याकडून दुप्पट टॅक्स वसूल करते. अनधिकृत घरे अधिकृत करण्यासाठी शासनाने गुंठेवारी योजनेला मंजुरी दिली. यापूर्वी १० हजार मालमत्ताधारकांनी याचा लाभ घेतला. मनपाला १२५ कोटींचा महसूल मिळाला. गुंठेवारी शुल्कातील सवलतही बंद करण्यात आली होती. पुन्हा सवलत द्यावी, अशी मागणी सुरू होती. प्रारंभी मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी ६०० चौरस फुटांपर्यंतच सूट देण्याची घोषणा केली. त्यानंतर १५०० चौरस फुटांपर्यंत शुक्रवारी दोन हजार चौरस फुटांपर्यंतच्या निवासी बांधकामांना पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. सोमवारपासून ही सवलत लागू होईल, त्यानंतर जून महिन्यापर्यंत ती लागू राहील, असे जी. श्रीकांत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
वास्तुविशारदांचे पॅनल
महापालिकेने यापूर्वी ५२ वास्तुविशारदांचे पॅनल तयार करून गुंठेवारीच्या स्वीकारल्या होत्या. महापालिकेतर्फे वास्तुविशारदांना त्यांच्या फाईलनुसार शुल्क अदा केले होते. आता पुन्हा एकदा पॅनल तयार केले जाणार असून, ज्यांना पॅनलची गरज नाही, त्यांनी सोयीनुसार कोणत्याही वास्तुविशारदामार्फत प्रस्ताव दाखल केला तरी चालेल, असे जी. श्रीकांत यांनी सांगितले.