दिलासादायक ! ‘म्युकरमायकोसिस’मुक्तीकडे औरंगाबादची वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:50 PM2021-09-03T16:50:23+5:302021-09-03T16:54:15+5:30
mucormycosis in Aurangabad : घाटी रुग्णालयात सहजपणे इंजेक्शन उपलब्ध होत असल्याने राज्यभरातून रुग्ण उपचारासाठी औरंगाबादेत दाखल झाले.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोनाच्या ( corona virus ) दुसऱ्या लाटेत कोरोनाबरोबरच ‘म्युकरमायकोसिस’ने ( Mucormycosis ) राज्यभरात एकच हाहाकार उडवला होता; पण औरंगाबाद जिल्ह्यात ८६ टक्के रुग्णांनी यशस्वी उपचार घेऊन या आजारावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या २४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, आता ‘म्युकरमायकोसिस’चे नवे रुग्ण आढळून येत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे ‘म्युकरमायकोसिस’मुक्तीकडे औरंगाबादची वाटचाल सुरू आहे, असे म्हटले तर वावगे नाही. ( Relief ! Aurangabad on its way to getting rid of ‘mucormycosis’)
कोरोनाच्या ९० टक्के रुग्णांना या आजाराला तोंड द्यावे लागले. राज्यभरासह जिल्ह्यात मे महिन्यात या आजाराच्या रुग्णांच्या उपचारासाठी लागणारे इंजेक्शन अपुरे पडले. रुग्णांच्या नातेवाइकांना आणि खाजगी रुग्णालयांना इंजेक्शनसाठी भटकंती करावी लागली. मात्र, ही स्थिती आता नाही. कारण नवे रुग्ण आढळत नसून, जिल्ह्यात सध्या २४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली.
घाटी रुग्णालयात सहजपणे इंजेक्शन उपलब्ध होत असल्याने राज्यभरातून रुग्ण उपचारासाठी औरंगाबादेत दाखल झाले. या आजारामुळे डोळे काढावेच लागतात, हा समज घाटीतील डाॅक्टरांनी खोटा ठरविला. तब्बल १५४ वर रुग्णांचे डोळे वाचविण्यात येथील डाॅक्टरांना यश आले. घाटीत सध्या ४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती कान, नाक, घसा विभागप्रमुख डाॅ. सुनील देशमुख यांनी दिली.
नवे रुग्ण नाहीत
सध्या ‘म्युकरमायकोसिस’चे नवीन रुग्ण नाहीत. जे पूर्वीचे आहेत, तेच रुग्ण सध्या आहेत. लसीकरणाचे प्रमाण वाढले आहे. प्रतिकारशक्ती निर्माण होत आहे. त्याचा काहीसा फायदा होत आहे.
-डाॅ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा शल्यचिकित्सक
औरंगाबादेतील म्युकरमायकोसिस रुग्णांची स्थिती :
एकूण रुग्ण- १,२४८
रुग्णालयातून सुटी झालेले रुग्ण- १,०७१
एकूण मृत्यू - १५३
उपचार सुरू असलेले रुग्ण- २४