तयारी शाळेची, पालकांना दिलासा! पहिल्यांदाच वह्यांच्या किमती घसरल्या, रजिस्टरचे भाव स्थिर
By प्रशांत तेलवाडकर | Published: May 22, 2024 07:38 PM2024-05-22T19:38:47+5:302024-05-22T19:42:00+5:30
वार्षिक निकाल लागताच त्या दिवशी नवीन शैक्षणिक वर्षासाठीच्या वह्या खरेदीचा नवा ट्रेंड पालकांमध्ये आला आहे.
छत्रपती संभाजीनगर : नवीन शैक्षणिक वर्षाला जून महिन्यात सुरुवात होणार आहे. शालेय साहित्य, स्टेशनरी खरेदीचे सर्वसामान्य पालकांना नक्कीच टेन्शन आले असेल. कारण, त्यांना घरखर्चात तडजोड करून विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्यावर खर्च करावा लागणार आहे. मात्र, दिलाशाची बाब म्हणजे यंदा उत्पादकांनी वह्यांच्या किमती कमी केल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी ज्या किमतीत वह्या विकत दिल्या होत्या, त्याच किमतींत यंदा वह्या मिळणार आहेत.
का कमी झाल्या वह्यांच्या किमती?
कागदाच्या किमतीत घट झाली आहे. कोरोना काळानंतर कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला होता. आता पुरवठा सुरळीत झाला आहे. परिणामी उत्पादकांनी वह्यांच्या किमती कमी केल्या आहेत. १०० पानी वहीमागे ५ रुपये व २०० पानी वहीमागे ५ रुपये कमी करण्यात आले आहेत.
मागील वर्षी व यंदाच्या किमती (प्रतिनग)
वह्या २०२२ २०२३ २०२४
१०० पानी वही २५ रु. ३० रु. २५ रु.
२०० पानी वही ५० रु. ६५ रु. ६० रु.
२०० पानी रजिस्टर ६० रु. ७५ रु. ७५ रु.
रजिस्टरच्या किमती स्थिर
उत्पादकांनी रजिस्टरच्या किमती कमी करण्याऐवजी दर्जा वाढविण्यावर भर दिला आहे. मुखपृष्ठाची जाडी थोडी वाढवून मॅट फिनिशिंग केले आहे. तसेच बहुतांश रजिस्टरवर निसर्गचित्रे छापण्यात आली आहेत. मागील वर्षाप्रमाणे २०० पानी रजिस्टर ७५ रुपये प्रतिनग विकले जात आहे.
निकालादिवशी वह्या खरेदीचा नवा ट्रेंड
वार्षिक निकाल लागताच त्या दिवशी नवीन शैक्षणिक वर्षासाठीच्या वह्या खरेदीचा नवा ट्रेंड पालकांमध्ये आला आहे. मुंबई व पुण्यात हा ट्रेंड जुना आहे. आता तोच ट्रेंड येथे आला आहे. यंदा इंग्रजी शाळांतील निकाल लागला आणि त्याच दिवशी अनेक पालकांनी वह्या खरेदी केल्या. इंग्रजी मध्यमामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ५० टक्के विद्यार्थ्यांनी वह्या खरेदी केल्या आहेत.
१०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांची खरेदी पूर्ण
प्रत्येक शाळेत नववीचा निकाल लवकर जाहीर करण्यात येतो व इयत्ता १० वीचा अभ्यासक्रम सुरू केला जातो. तसेच ११ वीचा अभ्यासक्रम लवकर संपवून उन्हाळ्यात १२वीचा अभ्यासक्रम सुरू केला जातो. क्लासेसही एप्रिलपासून सुरू करतात. या विद्यार्थ्यांची वह्या व रजिस्टरची खरेदी पूर्ण झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
४५ लाख वह्यांची आवक
नवीन शैक्षणिक वर्षासाठी मुंबई व जालना येथून ४५ लाख वह्यांची आवक बाजारपेठेत झाली आहे. मे व जून महिन्यांत यांपैकी ३८ लाख वह्यांची विक्री होईल. उर्वरित ७ लाख वह्यांची विक्री दिवाळीपर्यंत केली जाईल. ४५ लाखांपैकी ८० टक्के वह्या मुंबईतून, तर २० टक्के वह्या जालना येथील उत्पादकांकडून आणण्यात आल्या आहेत. तसेच ९५ टक्के वह्यांची मुखपृष्ठेच आता खाकी रंगाची आहेत.
- सुनील अजमेरा, सहसचिव, जिल्हा व्यापारी महासंघ