मृताच्या वारसांना मोठा दिलासा; न्यायालयाने मागणीपेक्षा दुपटीहून अधिक रक्कम केली मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 07:16 PM2022-12-14T19:16:25+5:302022-12-14T19:16:51+5:30
मागणी होती १४ लाखांची; मंजूर झाले व्याजासह ३१ लाख ८९ हजार रुपये
औरंगाबाद : दुचाकी आणि कंटेनरच्या अपघातात मरण पावलेले प्रदीप कपाटे यांच्या वारसांना ३१ लाख ८९ हजार रुपये ६ टक्के व्याजासह दावा दाखल झाल्याच्या तारखेपासून देण्याचा आदेश मोटार अपघात न्यायाधिकरणाचे अध्यक्ष व्ही. एस. कुलकर्णी यांनी दिला आहे.
अर्जदारांनी १४ लाखांची मागणी केली असली तरी न्यायालयाने अर्जदारांनी मागितलेल्या रकमेच्या दुपटीपेक्षा अधिक नुकसान भरपाई दावा दाखल झाल्याच्या तारखेपासून व्याजासह देण्याचा आदेश दिला आहे. प्रदीप कपाटे १६ डिसेंबर २०२१ रोजी रात्री टीव्हीएस. अपाचे मोटारसायकलने औरंगाबादहून अहमदनगरकडे नातेवाइकांना भेटण्यासाठी जात होते. मार्गात कंटनेर (टेलर) चालक माबूद अली याने कंटनेर वाहतुकीच्या नियमांची पर्वा न करता रस्त्यावरून डाव्या बाजूला कोणत्याही प्रकारचे इंडिकेटर न देता, कोणताही इशारा न करता वळविला. त्यामुळे कपाटे पाठीमागून कंटेनरला धडकले. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. कपाटे यांच्या वारसांनी १४ लाख रुपये नुकसान भरपाई मिळण्यासाठी ॲड. संदीप बी. राजेभोसले यांचेमार्फत मोटार अपघात न्यायाधिकरणात अर्ज दाखल केला होता. अर्जदारांतर्फे ॲड. राजेभोसले यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. सुधीर घोंगडे, ॲड. दिनेश चव्हाण, ॲड. सूरज देशमुख, प्रशांत गायकवाड, ऋषिकेश निकम, चैतन्य देशमुख यांनी सहकार्य केले.