धार्मिक स्थळ; आज सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:48 AM2017-10-24T00:48:12+5:302017-10-24T00:48:12+5:30
शहरातील धार्मिक स्थळांसंदर्भात अनेक नागरिकांनी मनपाकडे आक्षेप दाखल केले आहेत. उद्या मंगळवार, २४ आॅक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात सकाळी १० वाजेपासून सुनावणी घेतली जाणार आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील धार्मिक स्थळांसंदर्भात अनेक नागरिकांनी मनपाकडे आक्षेप दाखल केले आहेत. उद्या मंगळवार, २४ आॅक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात सकाळी १० वाजेपासून सुनावणी घेतली जाणार आहे. सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शासन निर्देशानुसार धार्मिक स्थळांची वर्गवारीनुसार अंतिम यादी बुधवारी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी दिली.
खंडपीठाच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या वतीने धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. या कारवाईचा अहवाल सुनावणीच्या वेळी न्यायालयात सादर करण्यात आला. सुनावणीदरम्यान न्यायालयाने संबंधित समितीची बैठक घेऊन आक्षेपांवर निर्णय घेण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार समितीची बैठक आयुक्त मुगळीकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. या बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर १२ आॅगस्ट रोजी शहरातील ११०१ धार्मिक स्थळांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. यापैकी ४४ धार्मिक स्थळे काढण्यात आल्यामुळे १ हजार ५६ धार्मिक स्थळांच्या यादीवर आक्षेप मागवण्यात आले होते. आॅगस्ट अखेरपर्यंत १ हजार १५९ आक्षेप प्राप्त झाले. आक्षेपांची छाननी करून सुनावणी घेण्यासाठी ६ अधिका-यांची समिती स्थापन करण्यात आली. या अधिका-यांच्या पथकाने धार्मिक स्थळांची स्थळ पाहणी करून तपासणी केली. त्यानंतर प्राप्त झालेल्या काही आक्षेपांवरील सुनावणी घेतली होती. पाच पथकांचा अहवाल तयार झाला नसल्यामुळे सुनावणी घेण्यात आली नाही. अधिका-यांनी धार्मिक स्थळांच्या वर्गवारीनुसार तपासणी करून विविध संस्था व विश्वस्तांकडील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. धार्मिक स्थळांसंदर्भात उच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या कार्यक्रमानुसार अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याकरिता प्राप्त झालेल्या आक्षेपांवरील सुनावणी उद्या २४ रोजी पूर्ण करून २५ रोजी वर्गीकरण करून अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात ६ पथकांमार्फत आक्षेपांवरील सुनावणी घेतली जाईल, सकाळी १० वाजेपासून सुनावणीला सुरुवात होणार असल्याचे मुगळीकर यांनी सांगितले.