धार्मिक स्थळ : मनपाचा कृती कार्यक्रम, शासन निर्णयानुसार कारवाईचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 01:17 AM2017-08-24T01:17:34+5:302017-08-24T01:17:34+5:30
महापालिकेचा कृती कार्यक्रम आणि शासन निर्णयानुसार शहरातील धार्मिक स्थळांच्या अतिक्रमणांबाबत कारवाई करण्याचे निर्देश देत न्या. शंतनू केमकर आणि न्या. एन. डब्ल्यू सांबरे यांच्या खंडपीठाने ‘सुमोटो’व्यतिरिक्त या संदर्भातील सर्व याचिका, दिवाणी अर्ज बुधवारी निकाली काढले
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिकेचा कृती कार्यक्रम आणि शासन निर्णयानुसार शहरातील धार्मिक स्थळांच्या अतिक्रमणांबाबत कारवाई करण्याचे निर्देश देत न्या. शंतनू केमकर आणि न्या. एन. डब्ल्यू सांबरे यांच्या खंडपीठाने ‘सुमोटो’व्यतिरिक्त या संदर्भातील सर्व याचिका, दिवाणी अर्ज बुधवारी निकाली काढले.
याचिकेवरील पुढील सुनावणी १२ आॅक्टोबरला होणार आहे. त्या दिवशी मनपाच्या कृती कार्यक्रमाचा अहवाल खंडपीठात सादर करावयाचा आहे. खंडपीठाने यापूर्वी दर शुक्रवारी प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.
मनपाचे अतिरिक्त शपथपत्र
मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी आज खंडपीठात अतिरिक्त शपथपत्र सादर करून खंडपीठाच्या आदेशानुसार २१ आॅगस्ट २०१७ रोजी मनपा स्तरावरील समितीची बैठक पार पडली. त्यात धार्मिक स्थळांची अतिक्रमणे हटविण्याबाबतच्या पूर्वीच्या कार्यक्रमावर चर्चा करून नव्याने कार्यक्रम तयार करण्यात आला. बैठकीस सर्वच सदस्य उपस्थित होते, असे म्हटले आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १२ आॅगस्ट रोजी वर्तमानपत्रात प्रगटन देऊन धार्मिक स्थळांबाबतचे आक्षेप व हरकती १८ आॅगस्टपर्यंत मागविण्यात आल्या. २०१५ साली ८०३ आक्षेप प्राप्त झाले होते, तर आता ११०५ असे एकूण १९०८ आक्षेप प्राप्त झाले आहेत. या हरकतींवर सुनावणी घेऊन निर्णय घेण्यासाठी वेळ लागणार आहे. म्हणून ५ मे २०११ च्या शासन निर्णयाचा विचार करून समितीने नवीन कृती कार्यक्रम आखला आहे. आज याचिकाकर्त्यांतर्फे न्यायालयाचे मित्र अॅड. प्रदीप देशमुख, इतर याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. आर. एन. धोर्डे व व्ही.जे. दीक्षित, अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे, अॅड. सुजित जोशी, अॅड. एस.के. कय्युम नाझीर, अॅड. श्रीकृष्ण सोळंके, अॅड. संदीप राजेभोसले, अॅड. सुशांत दीक्षित व अॅड. विक्रम धोर्डे यांनी काम पाहिले.