धार्मिकस्थळे तिरंग्याने सजली, भक्तीभावासह मंदिरात दिसली देशभक्ती 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 12:54 PM2024-08-16T12:54:59+5:302024-08-16T12:56:07+5:30

धार्मिकस्थळासोबतच वेरूळ, दौलताबाद, खुलताबाद, म्हैसमाळ आदी पर्यटनस्थळे पर्यटकांच्या गर्दीने फुलली होती.

Religious places were decorated with tricolour, patriotism was seen in temples along with devotion  | धार्मिकस्थळे तिरंग्याने सजली, भक्तीभावासह मंदिरात दिसली देशभक्ती 

धार्मिकस्थळे तिरंग्याने सजली, भक्तीभावासह मंदिरात दिसली देशभक्ती 

- सुनील घोडके

खुलताबाद : देशभरात गुरूवारी मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त खुलताबाद येथील भद्रा मारुतीच्या मूर्तीस तिरंगा झेंड्याचे आकर्षक रूप देऊन श्रृंगार करण्यात आला होता. त्यामुळे भक्तीभावासह मंदिरातही देशभक्ती दिसली होती. 

सध्या हिंदू धर्मियांचा पवित्र श्रावण महिना सुरू असल्याने खुलताबाद चा भद्रा मारूती, बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदीर भाविकांच्या गर्दीने फुलले असून स्वातंत्र्य दिनाची सुट्टी असल्याने मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी गुरूवारी गर्दी केली होती. धार्मिकस्थळासोबतच वेरूळ, दौलताबाद, खुलताबाद, म्हैसमाळ आदी पर्यटनस्थळे पर्यटकांच्या गर्दीने फुलली होती. 

भद्रा मारूती मूर्तीभोवती सजावट करण्यात आल्याने धार्मिकस्थळी देशभक्तीचे एक आगळेवेगळे रूप भाविकांना बघावयास मिळाले. भद्रा मारुतीच्या मूर्तीस तिरंगा झेंड्याचे आकर्षक रूप दिले. नागवेलीचे पाने, मध्यभागी अशोक चक्र असलेला पांढरा कपडा, मूर्तीस शेंदूर लावलेला तो भगवा रंग अशा तिरंगा झेंड्याचे रूप देण्यात आले होते. खुलताबाद येथील हनुमान भक्तांनी ही सजावट केली.

खुलताबाद, म्हैसमाळ परिसरात गर्दी
स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वांनाच सुटी असल्याने छत्रपती संभाजीनगर शहर व परिसरातील मोठ्या प्रमाणावर पर्यटक व भाविकांनी सहकुटुंब खुलताबाद, वेरूळ, म्हैसमाळ येथील धार्मिक व पर्यटनस्थळांना भेट दिली. गर्दीने हा परिसर फुलून गेला होता. दरम्यान सांयकाळी वेरूळ घाट, दौलताबाद घाटात वाहतुकीची कोंडी झाली होती. जगप्रसिद्ध वेरूळ लेणी, दौलताबाद घाट, देवगिरी किल्ला परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. छत्रपती संभाजीनगर ते खुलताबाद दरम्यान युवकांनी तिरंगा रॅली काढली होती. रिक्षा, मोटारसायकल, व चारचाकी वाहने तिरंग्याने सजली होती.

Web Title: Religious places were decorated with tricolour, patriotism was seen in temples along with devotion 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.