दिलासा, खासगी रुग्णालयांत मिळणार १४०० रुपयांतच रेमडेसिवीर इंजेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:04 AM2021-03-16T04:04:56+5:302021-03-16T04:04:56+5:30
औरंगाबाद : कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन महत्त्वपूर्ण ठरते. या एका इंजेक्शनसाठी आतापर्यंत अडीच हजार ते साडेचार हजार ...
औरंगाबाद : कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन महत्त्वपूर्ण ठरते. या एका इंजेक्शनसाठी आतापर्यंत अडीच हजार ते साडेचार हजार रुपये मोजावे लागत होते. मात्र, खासगी रुग्णालयांत आता अवघ्या १४०० रुपयांतच हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचा निर्णय मराठवाडा हाॅस्पिटल असाेसिएशनने घेतला आहे.
कोरोनावर सध्या कोणतेही औषध नाही. अशा परिस्थितीत सध्या रेमडेसिवीर हे औषध प्रभावी मानले जात आहे. त्यामुळे या इंजेक्शनला बाजारात मोठी मागणी आहे. या इंजेक्शनची आतापर्यंत बाजारात साडेचार हजारांपर्यंत किंमत होती. कोविड रुग्णांच्या उपचार व्यवस्थापनात या औषधांना तातडीच्या रुग्णांवर उपचारासाठी मान्यता देण्यात आली आहे. जे गंभीर रुग्ण आहेत, त्यांच्यात रेमडेसिवीरचा वापर केल्याने लवकर सुधारणा दिसून येत असल्याचे सांगितले जाते. मराठवाडा हाॅस्पिटल असाेसिएशनने सोमवारी औषध प्रशासन आणि रुग्णालयांशी केलेल्या चर्चेनंतर हे इंजेक्शन १४०० रुपयांत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मराठवाडा हाॅस्पिटल असाेसिएशनचे अध्यक्ष डाॅ. हिमांशू गुप्ता आणि सचिव डाॅ. शोएब हाश्मी यांनी दिली.
एका रुग्णाला सहा इंजेक्शन
रुग्णालयांबरोबर झालेल्या चर्चेनंतर आम्ही इंजेक्शनचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जास्तीत जास्त १४०० रुपयांत रेमडेसिवीर इंजेक्शन विकले जाईल. असोसिएशनशी संलग्नित रुग्णालयांत या दरात इंजेक्शन मिळेल. एका रुग्णाला ६ इंजेक्शन द्यावी लागतात. ही ६ इंजेक्शन ८ हजार ४०० रुपयांत उपलब्ध होतील.
-डाॅ. शोएब हाश्मी, सचिव मराठवाडा हाॅस्पिटल असाेसिएशन