रेमडेसिविर इंजेक्शन : जिल्हाधिकारी कार्यालयात मदत कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:05 AM2021-04-20T04:05:16+5:302021-04-20T04:05:16+5:30
सर्व खासगी रुग्णालयांनी कोविड नियमावलीचे पालन करून रुग्णांची वर्गवारी करत उपलब्ध रेमडेसिविर इंजेक्शन गंभीर रुग्णांना प्राधान्याने गरजेनुसार द्यावे, याबाबतची ...
सर्व खासगी रुग्णालयांनी कोविड नियमावलीचे पालन करून रुग्णांची वर्गवारी करत उपलब्ध रेमडेसिविर इंजेक्शन गंभीर रुग्णांना प्राधान्याने गरजेनुसार द्यावे, याबाबतची माहिती विहित नमुन्यात जिल्हा प्रशासनास सादर करणे बंधनकारक केले आहे. ज्या खासगी रुग्णालयांना रेमडेसिविरची आवश्यकता आहे, त्यांनी त्यासाठी रुग्णनिहाय आपली मागणी सविस्तर अर्जाद्वारे जिल्हाधिकारी मदत कक्षात सायंकाळी ६ वाजेपर्यंत (0240-2331200), तसेच अन्न व औषध प्रशासनचे निरीक्षक बजाज 9422496941 या क्रमांकावर व्हॉट्स ॲपद्वारे करावी, असे कळविण्यात आले आहे.
प्राप्त अर्जांची अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत तपासणी करून त्यानंतर घाटीच्या औषध विभागात पात्र अर्ज संदर्भित करण्यात येतील. त्यातील रुग्णांच्या गरजेनुसार रुग्णालयास डॉ. माधुरी कुलकर्णी यांच्यामार्फत रेमडेसिविर उपलब्ध करून देण्यात येईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिकरित्या रुग्णांच्या नातेवाईकांनी मदत कक्षात इंजेक्शनची मागणी करू नये. खासगी रुग्णालयामार्फतच इंजेक्शनची मागणी केल्यास त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.