रेमडेसिविर इंजेक्शन चोरी; ४८ इंजेक्शनची हेराफेरी झाली मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्येच, प्रशासनाला संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 11:56 AM2021-04-30T11:56:15+5:302021-04-30T11:58:05+5:30
या प्रकरणात पालिका प्रशासनाने भांडार विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.
औरंगाबाद : महापालिकेच्या चिकलठाणा एमआयडीसीतील मेल्ट्रॉन कोविड हॉस्पिटलमधून ४८ रेमडेसिविर इंजेक्शनची चोरी कुठे व कशी झाली, याच्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे; परंतु प्रशासन अद्याप ठोस कारणापर्यंत पोहाेचलेले नाही. इंजेक्शनचे बॉक्स चार दिवस मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्येच पडून होते. त्यामुळे बॉक्समधील इंजेक्शन हॉस्पिटलमध्येच बदलल्याचा संशय प्रशासनाला आहे.
या प्रकरणात पालिका प्रशासनाने भांडार विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. नोटिसांचा खुलासा शुक्रवारी समोर येणे शक्य आहे. इंजेक्शनच्या बॉक्समधून रेमडेसिविर काढून त्या जागी एमपीएस इंजेक्शन ठेवल्याचा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा गाफिल असल्याचे सिद्ध झाले. कोरोना झालेल्या रुग्ण नातेवाइकांची इंजेक्शनसाठी होणारी धावपळ जीवघेणी असताना पालिकेत असा बेजबाबदार कारभार होत असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
मनपा आरोग्य विभागाच्या स्टोअर रुममधून मेल्ट्रॉनच्या कोविड केअर सेंटरसाठी २० एप्रिलला रेमडेसिविर इंजेक्शनचे २६ बॉक्स पाठविण्यात आले. त्यात १२४८ इंजेक्शन होते. २३ एप्रिल रोजी मेल्ट्रॉनमधील फार्मासिस्टने इंजेक्शनच्या बॉक्सची तपासणी केली असता, त्यामध्ये एमपीएस इंजेक्शन आढळून आले. मेल्ट्रॉन येथील स्टोअर रुमच्या कर्मचाऱ्यांनी २० एप्रिलला इंजेक्शनचे २६ बॉक्स ताब्यात घेतले. त्यावेळी कागदपत्रांवर स्वाक्षरी केली; पण या कर्मचाऱ्यांनी बॉक्सची तपासणी केली की नाही. ४ दिवस हे बॉक्स तपासणीविना का पडून होते. ही बाब संशयास्पद आहे. पुरवठ्यानंतर चौथ्या दिवशी एक बॉक्स उघडला गेला आणि त्यात वेगळेच इंजेक्शन असल्याचे लक्षात आल्यानंतर सगळा प्रकार समोर आला. त्यामुळे २० ते २४ एप्रिल या चार दिवसात इंजेक्शन कोणी बदलले, याचा शोध प्रशासकीय यंत्रणेला घ्यावा लागणार आहे.
खुलासा करण्यासाठी २४ तासांची मुदत
नोटीस बजावण्यात आलेल्या ५ जणांना खुलासा करण्यासाठी २४ तासांची मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार शुक्रवारी ५ जणांचा खुलासा येईल. खुलासा पाहिल्यानंतर काय करायचे, याचा विचार होणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांनी सांगितले.