हे लक्षात असू द्या, अपघाती मृत्यूनंतर असंघटित कामगारांच्या कुटुंबियांना मिळतात दोन लाख !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 05:34 PM2021-11-26T17:34:06+5:302021-11-26T17:35:08+5:30
असंघटित कामगारांनी ई- श्रम पोर्टलवर नोंदणीचा लाभ घेऊन सुरक्षा कवच करून घेणे गरजेचे आहे.
- साहेबराव हिवराळे
औरंगाबाद : बांधकाम क्षेत्रासह इतर ठिकाणी काम करणाऱ्या असंघटित कामगारांचा अपघाती अंत झाला तर त्यांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये मिळतात, हे असंघटित कामगारांना माहीतच नाही. असंघटित कामगारांना विमा कवच आल्याने अनेक सुविधा उपलब्ध होत आहेत. शासनाने नुकतेच ई-श्रम पोर्टल सुरू केले असून, त्यात धोबी, बांधकाम व्यावसायिक, शेतमजूर, दूध, चहा, भाजीपाला विक्रेते, फेरीवाले, सायकल दुरुस्ती, गॅरेजवाले यासह ३०० व्यवसायांना ‘पंतप्रधान विमा योजना’ लागू करण्यात आलेली आहे.
केंद्र शासनाने ई-श्रम पोर्टल तयार केले आहे. असंघटित कामगारांनी पोर्टलवर नोंदणीचा लाभ घेऊन सुरक्षा कवच करून घेणे गरजेचे आहे. परंतु, हे बहुतांश असंघटित कामगारांना अद्याप माहीतच नाही.
पोर्टलवर ५२ हजार नोंदणी...
५२ हजार कामगारांनी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केली आहे. १२ लाखांचे उद्दिष्ट शासनाने दिलेले आहे. बहुतांश कामगारांची नोंदणी बाकी असून, याविषयी जागृती करण्याची गरज आहे. नोंदणीकृत कामगारच या योजनेसाठी पात्र असतील.
लॉकडाऊननंतर नोंदणीला जोर...
कामगार विमा नोंदणी विभागात तीन वर्षांत आठ हजार प्रस्ताव दाखल झाले आहेत. सर्वच ऑनलाईन ठिकाणी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केले जाते. कोविडमुळे तर ही नोंदणी करणे फार गरजेचे आहे. कारण अनेकांना कोविड काळात गंभीर प्रसंगातून जावे लागले.
- चंद्रकांत राऊत, कामगार उपायुक्त
योजना आहे, हेच ठाऊक नाही !
- शासनाच्या असंघटित कामगारांसाठी योजना आहेत, हे कळलेच नाही. अपघातात पेंटर, बांधकाम मजूर, दूध, भाजीपाला विक्रेत्यालाही विमा मिळतो, हे आता समजले.
- संजय जाधव (असंघटित कामगार)
- असंघटित कामगारांना शासनाच्या विविध सेवा-सुविधा मिळत नाहीत. कोविडनंतर लक्षात आले की, आपणही आता नोंदणी करायला हवी. म्हणून नोंदणी करण्यासाठी आलो आहे.
- उत्तम काकडे (असंघटित कामगार)