लक्षात असू द्या, बालविवाह रोखण्यासाठी थेट टोल फ्री नंबर १०९८ ला करा कॉल
By प्रशांत तेलवाडकर | Published: April 4, 2024 06:07 PM2024-04-04T18:07:31+5:302024-04-04T18:08:00+5:30
बालविवाह होत असताना हजर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो.
छत्रपती संभाजीनगर : राज्यात बालविवाहांची संख्या मोठी आहे. पण, आता बालविवाह रोखण्यासाठी सरकारी यंत्रणेला गावकरी साथ देत असल्याने हे प्रकार उजेडात येऊ लागले आहेत. तुमच्या गावात, घर परिसरात कुठे बालविवाह होत असले तर थेट टोल फ्री नंबर १०९८ वर कॉल करा, सरकारी यंत्रणा तिथे येऊन तो बालविवाह रोखतील.
किती वर्षाच्या आत लग्न कायद्याने गुन्हा ठरू शकतो
१) मुलीचे वय १८ वर्षांच्या आत व मुलाचे वय २१ वर्षांच्या आत असेल तर त्यांचा बालविवाह समजण्यात येतो.
२) बालविवाह अधिनियम २००६ नियम २२ अन्वये बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे.
३) २ वर्षांपर्यंत सक्त मजुरीची कैद, एक लाख रुपये दंड किंवा दोन्हीही शिक्षा.
कोणावर दाखल होऊ शकतो गुन्हा
बालविवाह होत असताना हजर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो. बालविवाह लावणाऱ्या गुरुजींपासून ते आई-वडील वऱ्हाडी, बँड, डिजेवाल्यांपर्यंत सर्वांवर गुन्हे दाखल होऊ शकतात.
चाइल्ड लाइनचा नंबर १०९८ कॉल करा
बालविवाह होत असल्यास तुम्ही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर किंवा चाइल्ड लाइनला १०९८ यानंबरवर कॉल करा. जो कॉल करून माहिती देतो त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येते. तसेच या नंबरवर कॉल केला तर त्याचे पैसे लागत नाहीत. तो नंबर विनाशुल्क आहे.
बालविवाह रोखण्याची कोणावर जबाबदारी ?
१) ग्रामपंचायत क्षेत्र : ग्रामपंचायत क्षेत्रात बालविवाह होत असले तर त्यास रोखण्याची जबाबदारी सर्व गावकऱ्यांवर आहे. मात्र, शासनाच्या वतीने प्रत्येक ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक हा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आहे. अंगणवाडी सेविकांना सहायक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.
२) शहरी भाग : शासनाच्या आदेशानुसार बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून शासनाने घोषित केले आहे.