फसवणूक कराल तर याद राखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:05 AM2017-07-20T00:05:26+5:302017-07-20T00:09:41+5:30
परभणी : कर्जमाफी करताना शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे़ शेतकरी सरकारवर नांगर फिरवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आ़ बच्चू कडू यांनी परभणीतील एल्गार मेळाव्यात बोलताना दिला़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कर्जमाफी करताना शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे़ बोलले एक आणि केले वेगळेच़ असा प्रकार झाला असून, ही कर्जमाफी आम्हाला मान्य नाही़ त्यामुळे शासनाला २३ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे़ त्यानंतर मात्र शेतकऱ्यांची फसवणूक केली तर याद राखा, शेतकरी सरकारवर नांगर फिरवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आ़ बच्चू कडू यांनी परभणीतील एल्गार मेळाव्यात बोलताना दिला़
राज्य शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केल्यानंतर या माफीमध्ये अनेक शेतकरी वगळले गेले आहेत़ बोटावर मोजण्या इतक्याच शेतकऱ्यांना माफीचा फायदा होणार असल्याने या कर्जमाफीविरूद्ध राज्यस्तरीय सुकाणू समितीने मार्गदर्शन मेळावे आयोजित केले आहेत़ याचाच एक भाग म्हणून १९ जुलै रोजी परभणी शहरातील श्रीकृष्ण गार्डन मंगल कार्यालयात एल्गार मेळावा पार पडला़ या मेळाव्यास सुकाणू समितीचे प्रमुख नेते आ़ बच्चू कडू यांच्यासह रघुनाथदादा पाटील, अजित नवले, किशोर ढमाले, अशोक ढवळे, कालिदास आपेट, करण गायकर, डॉ़ अशोक घुले आदींची प्रमुख उपस्थिती होती़ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री सुरेश वरपूडकर, आ़ विजय भांबळे यांनीही मेळाव्यास उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला़ आ़ बच्चू कडू म्हणाले, सध्याचे सरकार म्हणजे घरात हातभट्टी आणि दरवाज्यात अगरबत्ती अशा प्रकारचे आहे़ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने कर्जमाफीची घोषणा केली खरी़ परंतु, काढलेला अध्यादेश मात्र अफजल खानाचा आहे़ धर्माच्या, पैशाच्या जोरावर असे प्रकार कराल तर शेतकऱ्यांशी गाठ आहे़ हा शेतकरी बेैमान नसून आपल्या इमानदारीचे घेतल्याशिवाय राहणार नाही़, असा इशाराही त्यांनी दिला़ शासनाची कर्जमाफी ही फसवी असून, ती आम्हाला मान्य नाही़ शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र यावे, आत्महत्या करू नयेत तर लढायला शिकावे, असे आवाहन करतानाच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करा, असा सल्लाही त्यांनी दिला़ आतापर्यंत धर्माच्या, जातीच्या नावावर आम्हाला खेळविले़ परंतु, आता मात्र शेतकरी कट्टरवादी झाला आहे़ हे जून महिन्यात शेतकऱ्यांच्या संपाने दाखवून दिले आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही नेत्याची, धर्माची गरज नाही़ ‘गर्व से कहो हम किसान है’ असा नारा देत त्यांनी कर्जमाफी म्हणजे उपकार नव्हे तर शासन शेतकऱ्यांकडून लूटत असलेल्या पैशांचा परतावा आहे़ यावेळी बच्चू कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली़ ‘नरेंद्र मोदी, किसान विरोधी’ अशा घोषणा देण्यात आल्या़ शेतीमालाला भाव नाही, कर्जमुक्ती नाही तर मतही नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले़ प्रारंभी सुकाणू समितीमधील सदस्य करण गायकर, रघुनाथदादा पाटील, किशार ढमारे, डॉ़ अशोक घुले, कालीदास आपेट यांचीही भाषणे झाली़ आ़ विजय भांबळे, सुरेश वरपूडकर यांनीही मार्गदर्शन केले. शेतकरी संघटनेच्या रसिका ढगे यांनी प्रास्ताविक केले़ किसान सभेचे कॉ़ विलास बाबर यांनी सूत्रसंचालन केले़ मेळाव्यास सुरेश भुमरे, स्वराजसिंह परिहार, रामभाऊ घाटगे, गणेश घाटगे, किर्तीकुमार बुरांडे, अमृत शिंदे, श्रीनिवास जोगदंड, रामेश्वर आवरगंड, बालाजी मोहिते, विठ्ठल तळेकर, रामा शिंदे, धोंडीराम चव्हाण, सुभाष जावळे आदींसह जिल्हाभरातील हजारो शेतकरी उपस्थित होते़