माता, मातृभाषा, मातृभूमीला लक्षात ठेवा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 02:05 PM2020-02-12T14:05:38+5:302020-02-12T14:07:21+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६० वा दीक्षांत समारंभ

Remember mother, mother tongue, motherland: Governor Bhagat Singh Koshari | माता, मातृभाषा, मातृभूमीला लक्षात ठेवा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

माता, मातृभाषा, मातृभूमीला लक्षात ठेवा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

googlenewsNext
ठळक मुद्देज्या देशाने मातृभाषेत शिकविले, त्या देशाने उन्नती केली तिन्ही गोष्टींना सोबत घेऊन गेलात तर जीवनात ५० टक्के यश मिळेल.

औरंगाबाद : शिक्षणानंतर नोकरीच्या मागे लागून केवळ एखाद्या कार्यालयात ‘बाबू’ होता कामा नये. विद्यार्थ्यांनी आयुष्यात उच्च लक्ष्य ठेवले पाहिजे. त्यानुसार वाटचाल केली, तर यश नक्की पदरी पडेल. स्वत:सह देशाचे नावही मोठे केले पाहिजे. स्वत:ला शिक्षित करताना दुसऱ्यालाही शिक्षित करावे. मातृभाषा, मातृभूमी आणि माता यांना नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे, त्यातूनच खरी उन्नती होईल, असे प्रतिपादन कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६० वा दीक्षांत समारंभ मंगळवारी (दि. ११) भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी ते बोलत होते. सीएसआयआर-नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे (पुणे) संचालक प्रा. अश्विनीकुमार नांगिया यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्ञानपीठावर कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ. साधना पांडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांच्यासह विद्याशाखांचे अधिष्ठाता उपस्थित होते. 

भगतसिंह कोश्यारी म्हणाले, ज्या देशाने मातृभाषेत शिकविले, त्या देशाने उन्नती केल्याचे एका व्यक्तीने ४० देशांच्या केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. एखादा व्यक्ती जेव्हा मातृभाषेत बोलतो, तेव्हा तो आपलासा वाटतो. मला मराठीत बोलताना पाहून अनेक जण चकीत होतात. पदवी, पदव्युत्तर, पीएच.डी. शिक्षण घेतले; परंतु मातृभाषा, मातृभूमी आणि माता यांना नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे. या तिन्ही गोष्टींना सोबत घेऊन गेलात तर जीवनात ५० टक्के यश मिळेल. या गोष्टींमुळेच तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम बनाल, यश मिळेल. कारण चांगले विचार तयार होतील, असे कोश्यारी म्हणाले. प्राध्यापकाऐवजी इंजिनिअर बनण्यास का प्राधान्य दिले जाते, याचा किस्सा सांगताना इंजिनिअर झाल्यानंतर ‘१० टक्के’ वेगळे मिळत असल्याचा त्यांनी उल्लेख केला.

प्रा. अश्विनीकुमार नांगिया म्हणाले, सध्याची अर्थव्यवस्था ‘हायड्रोकार्बन’वरील आहे. मात्र, भूगर्भातील खनिजांचा ऊर्जेसाठी अमाप वापर झाला आहे. त्यामुळे ही ऊर्जा आता कमी पडत आहे. त्यामुळे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, लाटांपासून ऊर्जा अशा अपारंपरिक ऊर्जेच्या वापराकडे वळले पाहिजे. रोजगाराच्या अनेक संधी आहेत. त्यासाठी आवश्यक ज्ञान मिळविले पाहिजे. मल्टिटास्किंग, भाषा कौशल्य आत्मसात केले पाहिजे. डॉ. येवले यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. विद्यापीठातील संशोधनाचा दर्जा वाढविण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नवीन अधिनियम तयार केले आहे. त्यामुळे दर्जेदार समाज उपयुक्त संशोधन होईल, याची खात्री असल्याचे डॉ. येवले म्हणाले.

पदवी आधीच ‘प्रदान’
समारंभापूर्वीच विद्यार्थ्यांना पदवी प्रदान क रण्यात आलेली होती. उपस्थित मान्यवरांसोबत केवळ सांघिक छायाचित्र घेण्याचा समारंभ पार पडल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू होती. राज्यपालांच्या हस्ते पदवी मिळेल, अशी अनेकांची अपेक्षा होती; परंतु त्यांना केवळ सांघिक छायाचित्रावर समाधान मानावे लागले.

राज्यपालांकडून पंतप्रधानांची स्तुती, वारंवार उल्लेख
राज्यपाल कोश्यारी यांनी मार्गदर्शनादरम्यान वारंवार पंतप्रधानांचा उल्लेख करीत त्यांची स्तुती केली. सौर ऊजेचा वापर, हर घर शौचालय, घराघरांत गॅस, वीज यावर पंतप्रधानांनी कशा प्रकारे काम केले, याचे दाखले त्यांनी दिले. मी पंतप्रधानांची स्तुती करीत नाही. मात्र, छोट्या-छोट्या गोष्टीतून कशा प्रकारे विकास होतो, हे सांगण्याचा प्रयत्न असल्याचे कोश्यारी म्हणाले.

मातृभाषेचा संदेश; मात्र, मार्गदर्शन हिंदीत
एका विद्यापीठात गेलो, तेव्हा सर्व इंग्रजीत सुरू होते. तेव्हा मी रोखत मराठी येत नाही का, अशी विचारणा केली होती, असा उल्लेख सुरुवातीलाच भगतसिंह कोश्यारी यांनी केला; परंतु त्यांनी काही मोजक्याच मराठी शब्दांचा उल्लेख करीत हिंदीत मार्गदर्शन केले.

...तर पद सोडले पाहिजे
माझे कर्मचारी मला म्हणतात, तुम्ही ७८ वर्षांचे झाले आहात, सकाळपासून सायंकाळपर्यंत काम करतात, दौरे करतात, तुम्ही आराम केला पाहिजे; पण आराम मला नाही तुम्हाला पाहिजे, असे मी त्यांना म्हणतो. पंतप्रधान १८-२० तास काम करतात, मग राज्यपाल १६-१७ तास काम करून शकत नसेल तर पद सोडले पाहिजे, असेही कोश्यारी म्हणाले.

Web Title: Remember mother, mother tongue, motherland: Governor Bhagat Singh Koshari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.