जिल्ह्यात रिमझिम
By Admin | Published: September 1, 2014 12:29 AM2014-09-01T00:29:02+5:302014-09-01T01:09:58+5:30
बीड : जिल्ह्यात सर्वदूर दिवसभर संततधार पाऊस सुरू आहे़ सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे नद्या, नाले खळखळून वाहत आहेत़
बीड : जिल्ह्यात सर्वदूर दिवसभर संततधार पाऊस सुरू आहे़ सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे नद्या, नाले खळखळून वाहत आहेत़ जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे़ धारूर, बीड, अंबाजोगाई, केज, पाटोदा, गेवराई शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी साचले आहे़ रविवारी जिल्ह्यात सरासरी १७.६० च्या जवळपास पावसाची नोंद झाली होती़
मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात सूर्यदर्शन झालेले नाही. अधूनमधून रिमझिम पाऊस बरसत असल्याने पाणी पातळीत काही प्रमाणात का होईना वाढ होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले़ परळी शहरातील अंबेवेस पुलाखालून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले़ तालुक्यातील सरस्वती नदीला देखील मोठ्या प्रमाणात पाणी आले होते़ केज तालुक्यातील युसूफवडगाव परिसरात रविवारी पावसाचा जोर वाढल्याने केज तालुक्यातून वाहणाऱ्या मांजरा नदीला पूर आला होता़ गेवराई तालुक्यात देखील संततधार पावसाने हजेरी लावल्याने शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते़ शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील सखल भागात पाण्याचे मोठ-मोठे डोह साचले असल्याचे चित्र रविवारच्या पावसानंतर पहावयास मिळाले़ मागील तीन वर्षात ज्या नदीला पाणीच आलेले नाही त्या नद्या देखील संततधार पावसामुळे दुथडी भरून वहात असल्याचे चित्र पहावयास मिळाले़ (प्रतिनिधी)