जाधववाडीत मुघल महालाचे अवशेष
By Admin | Published: May 14, 2014 12:11 AM2014-05-14T00:11:12+5:302014-05-14T00:29:58+5:30
प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद जाधववाडीतील बाजार संकुलाच्या हद्दीतील मुघल महालाचे अवशेष मका हबच्या उभारणीत अडथळा ठरत असल्यामुळे ते पाडले जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद जाधववाडीतील बाजार संकुलाच्या हद्दीतील मुघल महालाचे अवशेष मका हबच्या उभारणीत अडथळा ठरत असल्यामुळे ते पाडले जाण्याची भीती व्यक्त होत आहे. असे झाल्यास या ऐतिहासिक महालाची माहिती भविष्यात फक्त पुस्तकातच उपलब्ध असेल. जाधववाडी बाजार संकुलाच्या पूर्वेस ५० एकरांवर मका हब उभारण्यात येणार आहे. याच हद्दीत सुंदर मुघल महाल बांधण्यात आला होता. मुघल स्थापत्य कलेचा हा उत्कृष्ट नमुना आहे. काळाच्या ओघात या महालाकडे दुर्लक्ष झाले आणि आज फक्त या महालाचे काही अवशेष व तटबंदी उभी आहे. महालाच्या उत्तरमुखी (नगारखाना) प्रवेशद्वाराचे अवशेष आजही आढळतात. त्यावरून या महालाच्या भव्यतेची प्रचीती येते. औरंगजेबाच्या काळात ही वास्तू उभारण्यात आल्याचे इतिहास संशोधक सांगतात. त्यावेळी शहराबाहेर मुघल सरदार व फौजेला राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आताच्या जाधववाडी परिसरात मुघल महाल उभारण्यात आला होता. उत्तरमुखी प्रवेशद्वारासह चारही बाजूंनी तटबंदी होती. त्याच्या चारही कोपर्यांवर मुघल स्थापत्यशैलीतील सुंदर घुमट (डोम) होते. या घुमटांचे अवशेष आताही इतिहासाची साक्ष देतात. यावरूनच महालाच्या विस्तीर्ण आवारासह त्याच्या भव्यतेची कल्पना येते. या महालाच्या मुख्य इमारती काळाच्या ओघात नष्ट झाल्या. त्यांचे दगड, विटा फार पूर्वीच चोरीस गेल्या आहेत. नहरीद्वारे पाण्याची व्यवस्था मुघल महालात पाणीपुरवठ्यासाठी नहरीतून पाणी येण्याची व्यवस्था करण्यात आली होती. महालाच्या पूर्वेस आजही तटबंदी उभी आहे. एक ते दीड फूट रुंद असलेल्या या मजबूत तटबंदीवरही नक्षीकाम करण्यात आले होते. याच ठिकाणी मागील बाजूस हौद बांधण्यात आला होता. दुरून नहरीद्वारे पाणी येथे आणले जाऊन हौदाच्या समोरील बाजूस हे पाणी छोट्या कालव्यात पडेल, अशी व्यवस्था होती. हा कालवा ७० ते ८० फूट लांब आहे. आता बुजलेल्या कालव्याचे अवशेष दिसतात. मुख्य प्रवेशद्वाराची उत्तरेकडील बाजू तग धरून आहे. मात्र, मागील बाजू पडली आहे. विटांचे बांधकाम व दगडी खांबांवरील अवशेष शिल्लक आहेत. दरवाजावरील छतही बंगालच्या पाल स्थापत्यशैलीशी मिळतेजुळते आहे. महालाच्या चारही कोपर्यांवर अष्टकोनी छत्र्यांचे अवशेष शेवटची घटका मोजत आहेत. या छत्र्यांच्या पहिल्या मजल्यावर जाण्यास जिने आहेत. तळघरात छोटी खोली असून रखरखते ऊन असताना या छोट्या खोल्यांमध्ये जाऊन उभे राहिल्यास वातानुकूलित यंत्रणेसारखा गारवा तेथे जाणवतो. यामुळेच येथे दुपारच्या वेळी अनेक जण विश्रांतीसाठी येतात. अलीकडच्या काळात दुपारी व सायंकाळी येथे दारुड्यांचीही गर्दी असते. मका हबमध्ये महालाचे अवशेषही जाणार बाजार समितीच्या ५० एकरांवर उभारण्यात येणार्या मका हबसाठी कृषी पणन विभाग संरक्षक भिंत बांधत आहे. ही भिंत बांधताना आतापर्यंत प्राचीन महालाच्या अवशेषांना धक्का लागणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे; परंतु मका हबच्या उभारणीत हे अवशेष अडथळे ठरू शकतात. त्यामुळे ते पाडले जाऊ शकतात. याविषयी पणन विभागाच्या अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण अधिकारी उपलब्ध झाले नाहीत.