मोबाईलमुळे होतेय दूरची नजर कमजोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 11:59 PM2018-12-01T23:59:07+5:302018-12-01T23:59:15+5:30
आधुनिक युगात प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आला आहे. मोबाईलमुळे अनेक कामे सोपी झाली आहेत; परंतु त्याच वेळी मोबाईलवर तासन्तास गेम खेळणे, इंटरनेटचा वापर आणि सोशल मीडियावर व्यस्त राहण्याने डोळ्यांवर परिणाम होत आहे.
औरंगाबाद : आधुनिक युगात प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आला आहे. मोबाईलमुळे अनेक कामे सोपी झाली आहेत; परंतु त्याच वेळी मोबाईलवर तासन्तास गेम खेळणे, इंटरनेटचा वापर आणि सोशल मीडियावर व्यस्त राहण्याने डोळ्यांवर परिणाम होत आहे. विशेषत: मुलांमध्ये दूरच्या नजरेसाठी उणे क्रमांकाच्या चष्म्याचे प्रमाण वाढत आहे. यासाठी कुठेतरी मोबाईल कारणीभूत ठरत असल्याचे नेत्रतज्ज्ञांनी सांगितले.
औरंगाबाद नेत्रतज्ज्ञ संघटनेतर्फे शहरातील शाळांमध्ये वेळोवेळी मुलांची नेत्र तपासणी केली जाते. तपासणीदरम्यान मुलांमध्ये डोळ्यांसंदर्भातील विविध दोष समोर येतात. यात गेल्या काही वर्षांत मुलांमध्ये ‘मायोपिया’चे प्रमाण अधिक असल्याचे आढळून येत आहे. ‘मायोपिया’ हा डोळ्यासंबंधी एक आजार आहे. यात मुलांना दूरचे पाहण्यास त्रास होतो आणि दूरवर असलेल्या बाबी अंधूक दिसतात. डोळ्यांमध्ये येणारे नंबर हे दोन प्रकारचे असतात. एक दूरच्या नजरेचा नंबर आणि दुसरा जवळच्या नजरेचा नंबर. दूरची नजर अस्पष्ट होण्यासाठी मायोपिया हे एक कारण आहे. यात दूरच्या नजरेसाठी मायनस नंबरचा चष्मा वापरावा लागतो. चष्म्याशिवाय मुलांना दूरचे पाहण्यास अडथळा येतो.
दृष्टिदोषासाठी आनुवंशिक कारणांबरोबर टीव्ही, संगणक, आयपॅड, मोबाईल यासारखी प्रकाश राहणारी स्क्रीनची उपकरणे कारणीभूत ठरत आहेत. यामध्ये मोबाईलचा वापर तासन्तास होत आहे. मैदानात खेळण्याऐवजी मुले मोबाईलवर तासन्तास खेळतात. रात्री अंधारात मोबाईल पाहिला जातो. अशावेळी मोबाईलचा उजेड थेट डोळ्यांवर पडतो आणि डोळ्यांवर ताण वाढतो. या सगळ्या कारणांमुळे उणे क्रमांकाचा चष्मा साधारण १६ वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये अधिक दिसून येत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
हा होतो मुलांना त्रास
मुलांना दूरचे सहज दिसत नाही. विशेषत: शाळेत फळ्यावर लिहिलेले दिसण्यास अडचण येते. मुलांवर प्रत्येक बाब जवळ जाऊन पाहण्याची वेळ येते. अनेक मुले टीव्हीदेखील अगदी जवळ जाऊन पाहतात. त्यामुळे वेळीच खबरदारी घेण्याची गरज आहे. मुलांनी किमान दोन तास मैदानावर खेळले पाहिजे. मोबाईलचा वापर कमीत कमी करण्याची गरज असल्याचे नेत्रतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
वापरावर नियंत्रण हवे
मोबाईल, आयपॅडचा वापर वाढला आहे. परिणामी, मुलांना दूरच्या नजरेसाठी उणे क्रमांकाचा चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. शाळेत करण्यात येणाऱ्या नेत्र तपासणीत ही बाब प्राधान्याने समोर येत आहे. त्यामुळे मोबाईल, आयपॅडसारखा उपकरणांच्या वापरावर नियंत्रण ठेवले पाहिजे.
-डॉ. सुनील कसबेकर,
अध्यक्ष, औरंगाबाद नेत्रतज्ज्ञ संघटना
१५ टक्के मुलांना त्रास
मोबाईलवर खेळणे, इंटरनेटचा अधिक वेळ वापर केला जात आहे. मोठ्या व्यक्तींचे डोळे विकसित झालेले असतात, तर लहान मुलांचे डोळे विकसित होत असतात. त्यामुळे मोठ्या व्यक्तींच्या तुलनेत १६ वर्षांपर्यंतच्या मुलांना दूरचे दिसण्यासाठी मायनस नंबरचा चष्मा लागण्याचे प्रमाण जवळपास १५ टक्के आहे.
-डॉ. आनंद पिंपरकर, नेत्रतज्ज्ञ