गिरणी चालकाला वीजचोरीसाठी रिमोटचा वापर पडला तब्बल २ लाखांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 01:38 PM2020-11-27T13:38:59+5:302020-11-27T13:44:23+5:30
महावितरणची पीठ गिरणीचालकाविरुद्ध कारवाई
औरंगाबाद : पिठाच्या गिरणीसाठी वीज मीटरमध्ये रिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्याविरुद्ध महावितरणने केलेल्या कारवाईत १७ हजार ८५६ युनिटची चोरी केल्याचे उघड झाले. महावितरणने गिरणीचालकाला १ लाख ९७ हजार ७४८ रुपयांचे अनुमानित बिल दिले आहे.
हडकोतील एक गिरणीचालक रिमोटद्वारे वीजचोरी करीत असल्याची तक्रार सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गिते यांच्याकडे आली होती. डॉ. गिते यांनी मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांना तक्रारीची शहानिशा करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शहर-२ च्या पथकाने बुधवारी सायंकाळी ५.४५ च्या सुमारास हडको एन-११ मधील शिकारे गिरणीची तपासणी केली. एन-१२ शाखेचे सहायक अभियंता मनीष अंभोरे व मीटर चाचणी कक्षाचे सहायक अभियंता विठ्ठल सपकाळ यांनी सुरुवातीला भेट दिली तेव्हा गिरणी बंद होती.
महिला अधिकाऱ्याने एक किलो ज्वारी नेली दळायला
शहर-२ विभागाच्या कार्यकारी अभियंता निधी गौतम एक किलो ज्वारी घेऊन त्या गिरणीमध्ये ग्राहक बनून गेल्या. गिरणीचालक सुरेश पूनम शिकारे याने गिरणी चालू करताच गौतम यांनी आपल्या सहकाऱ्यांना सूचित केले. सिडकोचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अनिल कराळे, अजय भंगाळे, सहायक अभियंता अंभोरे, सपकाळ, मुख्य तंत्रज्ञ रवींद्र गडप्पा, तंत्रज्ञ सोमाजी जाधव यांनी गिरणीवर धाड टाकली.
चोरीचे प्रात्यक्षिकही दिले
गिरणीच्या भिंतीवर अडकविलेल्या पिशवीत लपवलेले रिमोट सापडले. गिरणीचालकाने रिमोटने मीटरचा डिस्पले बंद करून वीजचोरी करीत असल्याची कबुली दिली. त्याचे प्रात्यक्षिकही दाखवले. पथकाने रिमोट व मीटर जप्त केले. महावितरणच्या प्रयोगशाळेत मीटरची तपासणी केली असता या ग्राहकाने गेल्या दोन वर्षांत १७ हजार ८५६ युनिटची वीजचोरी केल्याचे सिद्ध झाले. त्यानुसार ग्राहकाला १.९७ लाखांचे बिल देण्यात आले. विद्युत कायद्याच्या कलमांनुसार ही कारवाई करण्यात आली.