भारत सोनवणे यांना अध्यक्षपदावरून हटवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:04 AM2021-06-26T04:04:12+5:302021-06-26T04:04:12+5:30
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ : लाड-पागे समितीची प्रकरणे रखडवल्याचा आरोप औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील लाड-पागे समितीअंतर्गत वारसांना ...
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ : लाड-पागे समितीची प्रकरणे रखडवल्याचा आरोप
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील लाड-पागे समितीअंतर्गत वारसांना सेवेत सामावून घेण्याची रखडलेली प्रकरणे मार्गी लावा. समितीचे अध्यक्ष डॉ. भारत सोनवणे यांना हटवा, कोरोनाकाळात सेवा बजावताना दगावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना सेवेत सामावून घ्या. मुस्लिम, भंगी जातीतील उमेदवारांना लाड-पागेअंतर्गत सेवेत घ्या, अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास जगताप यांच्यासह शिष्टमंडळाने घाटीच्या अधिष्ठातांकडे केली आहे.
लाड, पागे समितीच्या प्रस्तावांची प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढा, अशी मागणी चार वेळा केली. अन्यथा १ जुलैपासून उपोषण करण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष विलास जगताप, प्रेमनाथ सातपुते, अब्दुल शफी बेग, नितीन रोजेगावकर यांनी दिला होता. यासंदर्भात सर्व संबंधीत अधिकारी, मंत्री यांना निवेदने दिली. मात्र, घाटी प्रशासनाने आंदोलन न करण्याची तसेच कारवाईची ताकीद दिली, ती अनधिकृत असल्याचा आरोप जगताप यांनी करत आंदोलनाच्या पवित्र्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले.
घाटी रुग्णालय ते अधिष्ठाता कार्यालय परिसरात शुक्रवारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी उपाधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे - कागीनाळकर यांच्या समवेत पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. लाड-पागे समितीची प्रकरणे ३० दिवसांत निकाली काढणे बंधनकारक आहेत. मात्र, समितीचे अध्यक्ष डॉ. भारत सोनवणे, सदस्य प्रशासकीय अधिकारी जे. डी. राठोड, प्रशासकीय अधिकारी दिलीप गोधणे यांच्या मुजोरीपायी उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. असा आरोप करत डॉ. सोनवणे यांना या समितीवरून तत्काळ हटवण्याची मागणी केली. यावेळी बेगमपुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी व सुरक्षा बलाचा फौजफाटाही उपस्थित होता.
--
जे लोक मला काढण्याची मागणी करताहेत त्यांना का काढायचे, हेही विचारा. माझ्याकडे पदभार असल्यापासून सर्वाधिक प्रकरणे निकाली काढली. आता पदे रिक्त नाहीत. त्यामुळे प्रलंबित प्रकरणे म्हणता येणार नाही.
-डॉ. भारत सोनवणे, अध्यक्ष, लाड-पागे समिती, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद