निर्बंध हटवाच; व्यवसाय घटल्याने व्यापाऱ्यांचा आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 06:21 PM2021-07-01T18:21:42+5:302021-07-01T18:36:48+5:30

संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने औरंगाबाद जिल्ह्यास तिसऱ्या यादीत टाकले आहे.

Remove restrictions; Merchants insist on declining business | निर्बंध हटवाच; व्यवसाय घटल्याने व्यापाऱ्यांचा आग्रह

निर्बंध हटवाच; व्यवसाय घटल्याने व्यापाऱ्यांचा आग्रह

googlenewsNext
ठळक मुद्देनियम शिथिलतेसाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार द्यावा

औरंगाबाद : शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अतिअल्प असताना, येथे तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कसे व का लावले? सरकार व्यापाऱ्यांच्या जिवावर उठले आहे का? असा संतप्त सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. दोन दिवसांपासून पुन्हा लागू केलेल्या निर्बंधामुळे व्यवसाय घटून २० ते ३० टक्क्यांवर आला आहे. स्थानिक पातळीवर रुग्णसंख्या पाहून निर्बंध शिथिल करण्याचा किंवा वाढविण्याचा निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना संपूर्ण अधिकार द्यावेत, अशी मागणी होते आहे. सरकारने निर्णय बदलला नाही, तर नाईलाजाने रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही व्यापाऱ्यांनी दिला.

संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने औरंगाबाद जिल्ह्यास तिसऱ्या यादीत टाकले आहे. यामुळे सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजताच दुकाने बंद करावी लागत आहेत. तसेच शनिवार, रविवार संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे. मंगळवारपासून या नवीन निर्बंधाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. दोन दिवसात शहरातील व्यवसाय ७० टक्क्यांवरून घसरून २० ते ३० टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. व्यापारी स्वत:ची, कर्मचाऱ्यांची व ग्राहकांची संपूर्ण काळजी घेत आहेत. गंभीर परिस्थिती नसतानाही निर्बंध लादून सरकार व्यापाऱ्यांच्या ‘पोटा’वर पाय देत आहे, अशा संतप्त भावना शहरातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

पर्यटनाच्या राजधानीत नुकतीच पर्यटनस्थळे सुरू झाली. येथे शनिवार व रविवार पर्यटक जास्त असतात. त्याच दिवसात बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे. यातून पर्यटन राजधानीबद्दलचा चुकीचा संदेश देशभरात जाईल. त्याचा दूरगामी परिणाम जिल्ह्यास भोगावा लागेल, असेही काही व्यापाऱ्यांनी बोलून दाखविले.

सरकारने फेरविचार करावा
शहरात कोरोना रुग्णांची संख्या दोन आकडी नसतानाही सरकारने तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लादले आहेत. हा अत्यंत चुकीचा आदेश देण्यात आला. याचा फेरविचार राज्य सरकारने करावा. कारण, मागील दोन दिवसात व्यवसाय मोठ्या प्रमाणात घटला आहे.
- प्रफुल्ल मालाणी, अध्यक्ष, मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड ॲण्ड कॉमर्स

रस्त्यावर उतरावे लागेल
शनिवार, रविवार दुकाने उघडण्यात यावीत, दररोज सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात यावी, याचे निवेदन आम्ही मुख्यमंत्री, पालकमंत्री, सर्व आमदार, खासदार, जिल्हाधिकारी सर्वांना दिले आहेत. मात्र, कोणीच व्यापाऱ्यांचे म्हणणे ऐकत नसेल, तर अखेर नाईलाजाने व्यापाऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल. त्याशिवाय पर्याय नाही.
- लक्ष्मीनारायण राठी, महासचिव, जिल्हा व्यापारी महासंघ


निर्बंधाचा उलाढालीवर मोठा परिणाम
दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने बंद करावी लागत आहेत. नेमका सायंकाळीच व्यवसाय होत असतो, पण नेमके त्याचवेळी लॉकडाऊन होत असल्याने उलाढालीवर मोठा परिणाम झाला आहे. निर्बंध लावा, पण व्यापाऱ्यांच्या पोटावर पाय देऊ नका.
- अनिल चुत्तर, माजी अध्यक्ष, जिल्हा ऑटोमोबाईल ॲण्ड टायर डीलर्स असोसिएशन

सरकार व्यापाऱ्यांच्या जिवावर उठले आहे का?
कोरोना रुग्णसंख्या १० च्या आत आली असताना २१ दिवसांनंतर पुन्हा कडक निर्बंध आणत आहे. हे सरकार व्यापाऱ्यांच्या जिवावर उठले आहे का? देशांतर्गत व्यापार सरकारला संपवायचा आहे का?
- विनोद लोया, अध्यक्ष, कापड व्यापारी संघटना

Web Title: Remove restrictions; Merchants insist on declining business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.