डांबराचे थर काढा अन्यथा मकई गेटचा पुल कोसळेल; ऐतिहासिक वारसा अनागोंदीचा शिकार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 02:44 PM2023-09-01T14:44:45+5:302023-09-01T15:03:42+5:30
किमान ३५० वर्षांपासून हा पूल शहरवासीयांचा भार सांभाळत ताठ मानेने उभा आहे. मात्र, त्याच्या देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे
- शेख मुनिर
छत्रपती संभाजीनगर : जवळपास ३५० वर्षांपूर्वी बांधलेला ऐतिहासिक मकई दरवाजा व पुलाकडे होणाऱ्या अक्षम्य दुर्लक्षामुळे तो कोसळण्याच्या मार्गावर आहे. वारंवार डांबरीकरणाचे थरावर थर चढवून पुलावर प्रचंड भार वाढला आहे. ते डांबराचे थर काढल्याशिवाय त्या पुलावर सिमेंट काॅंक्रीटीकरण करण्यास भारतीय पुरातत्त्व विभागाने मनाई केली असल्याने या रस्त्याचे काम रखडले आहे.
ऐतिहासिक मकाई गेट आणि पुलाचे बांधकाम १६८० ते १६८३ या काळात करण्यात आले. किमान ३५० वर्षांपासून हा पूल शहरवासीयांचा भार सांभाळत ताठ मानेने उभा आहे. मात्र, त्याच्या देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने या पुलाच्या भिंतीवर मोठमोठी झाडे उगवली आहेत. शिवाय पुलावरून मोठी जलवाहिनी टाकण्यात आली. या जुन्या पुलावरून १६ टायरचे अवजड ट्रक मालवाहतूक करतात. पुलावर वेळोवेळी डांबरीकरण केल्याने रोडची जाडी आणि वजन खूप वाढल्याने या पुलाला धोका निर्माण झाला आहे. सध्या येथे सुरू असलेले सिमेंट काॅंक्रीट टाकण्याचे काम भारतीय पुरातत्व विभागाने थांबविले आहे. या पुलावर डांबराचे चढविलेले थरावर थर काढून त्यावरील वजन कमी करा, अशी पूर्वअट पुरातत्त्व विभागाने घातली आहे. त्याचबरोबर दिल्ली गेटप्रमाणे गेटच्या दुतर्फा रस्ता तयार करून या गेटचे सौंदर्यीकरण करावे आणि आतून होणारी वाहतूक बंद करावी, असा दुसरा पर्यायही विभागाने सुचविला आहे.
हा ऐतिहासिक दरवाजा पाहण्यासाठी पर्यटक येतात. मात्र, पर्यटक व त्यांची वाहने थांबण्यासाठी येथे जागाच नाही. त्यामुळे पर्यटकांना धावत्या वाहनातूनच गेट पाहावे लागते. गेटच्या दोन्ही बाजूची जागा पुरातत्व विभागाने आपल्या ताब्यात घेतली असून, त्यावर कुंपण टाकण्याचे काम सुरू आहे. गेटच्या बाजूला टाकण्यात आलेली मोठी केबलही काढण्यात येणार आहे. यानंतर कोणालाही केबल किंवा इतर कोणतेही काम करण्यास परवानगी मिळणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मोजकेच ऐतिहासिक दरवाजे शिल्लक
आपल्या या ऐतिहासिक वारशाचे संगोपन व देखभालीसाठी शहरातील नागरिक पुढे आले तर हे स्मारक सुंदर करण्याची आमची तयारी आहे. या गेटवर विद्युत रोषणाई व कारंजे, संगीत आदी वेगवेगळे उपक्रम राबविले जाऊ शकतात. शहरात काही मोजकेच ऐतिहासिक दरवाजे शिल्लक राहिले आहेत. याकडे आम्ही दुर्लक्ष केले तर हे सुद्धा लवकरच धाराशाही होतील.
- अनिल गोटे, सहसंचालक, भारतीय पुरातत्त्व विभाग