‘लायसन्स’ काढायचे? मग थोडे थांबा; वेबसाईट बंद असल्याने वाहनचालकांना मनस्ताप
By संतोष हिरेमठ | Published: May 17, 2024 03:47 PM2024-05-17T15:47:36+5:302024-05-17T15:48:01+5:30
लर्निंग आणि पर्मनंट लायसन्स काढण्यासाठी आधी वेबसाईटवरून अपाॅइंटमेंट घ्यावी लागते.
छत्रपती संभाजीनगर : लर्निंग, पर्मनंट लायसन्ससाठी अपाॅइंमेंट घेणे गेल्या दोन दिवसांपासून अवघड होत आहे. कारण ‘सारथी’ हे संकेतस्थळ गेल्या दोन दिवसांपासून बंद आहे. १८ तारखेपर्यंत हे संकेतस्थळ बंदच राहणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना आता थेट साेमवारनंतरच ‘लायसन्स’ काढता येणार आहे.
‘सारथी’ हे संकेतस्थळ बुधवारी अचानक बंद पडले. या संकेतस्थळावर ‘ हे पोर्टल देखभालीमुळे १८ मे रोजी सकाळी १० वाजेपर्यंत बंद राहील’ असा संदेश दिसतो. लर्निंग आणि पर्मनंट लायसन्स काढण्यासाठी आधी या संकेतस्थळावरून अपाॅइंटमेंट घ्यावी लागते. अपाॅइंटमेंट घेतल्यानंतर दिलेल्या तारखेला चाचणी द्यावी लागते. चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतरच लायसन्स मिळते. मात्र, संकेतस्थळ १८ तारखेपर्यंत बंद राहील. शनिवार आणि रविवारी आरटीओ कार्यालय बंद राहते. त्यामुळे ‘लायसन्स’चे कामकाज सोमवारीच सुरळीत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.