सह्याद्री हिल्स येथील ४० फूट रुंद रस्त्यावरील अतिक्रमण हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:33 AM2020-12-17T04:33:35+5:302020-12-17T04:33:35+5:30
औरंगाबाद : शिवाजीनगर रोडवरील सह्याद्री हिल्सच्या बाजूला ४० फूट रुंद रस्त्यावर अतिक्रमण झाले असून, हा रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी महापालिकेने ...
औरंगाबाद : शिवाजीनगर रोडवरील सह्याद्री हिल्सच्या बाजूला ४० फूट रुंद रस्त्यावर अतिक्रमण झाले असून, हा रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी महापालिकेने खुला करून द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी दोन दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत केली होती. बुधवारी सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने नागरिकांना रस्ता मोकळा करून दिला. त्यामुळे नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला.
सह्याद्री हिल्स येथील विकास आराखड्यातील रस्ता खुला करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सह्याद्री हिल्स सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता. यासंदर्भात मनपा प्रशासक यांना निवेदन देवूनही कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचे गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते. विकास आराखड्याच्या संबंधित ३५०२.४५ चौरस मीटर जागेवर तारेचे कुंपण लावून ही जागा म्हणजे डीपी रोड रहदारीसाठी बंद केला आहे. हे मनपाच्या जागेवर अतिक्रमण असून, रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी केली होती. याची दखल घेत मनपाच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी सकाळी गारखेडा येथील गट क्र. ५३/२/१ सहयाद्री हिल्स, शिवाजीनगर ते एमरॉल्ड सिटीपर्यंत १२ मिटर रुंद विकास योजना रस्ता विकासकाने बंद करुन ठेवला होता. तो रस्ता सार्वजनिक वाहतूकीसाठी मोकळा करण्यात आला. तसेच सह्याद्री हिल्समधील इमारत क्रमांक पी/१, पी/२ च्या पार्किंग मध्ये बांधलेले अनधिकृत १२ बाय १५ फूट पत्र्याची खोली व २० बाय २० फूट पत्र्याचे स्टोअरचे अतिक्रमण काढून घेत पार्किंग मोकळी करण्यात आली.