तीन दशकांपासूनचे अतिक्रमण काढले; किलेअर्क येथील सुमारे ३ कोटी रुपयांची जागा महापालिकेच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 01:28 PM2021-01-30T13:28:34+5:302021-01-30T13:32:07+5:30
Aurangabad Municipal Corporation सिटी चौक ते किलेअर्कपर्यंत १५२ कोटी रुपयांच्या शासन निधीतून रस्ता आणि ब्रीज उभारण्यात येत आहे.
औरंगाबाद : किलेअर्क येथील नाल्याजवळ महापालिकेच्या मालकीची जवळपास दोन हजार चौरस फूट जागा तीन दशकांपासून अतिक्रमित होती. बाजार मूल्यानुसार तीन कोटी रुपयांची ही जागा शुक्रवारी महापालिकेने पोलीस बंदोबस्तात ताब्यात घेतली. अतिक्रमण करणार्या नागरिकांनी प्रारंभी कडाडून विरोध केला. अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांनी घटनास्थळी धाव घेऊन कारवाई पूर्ण केली.
सिटी चौक ते किलेअर्कपर्यंत १५२ कोटी रुपयांच्या शासन निधीतून रस्ता आणि ब्रीज उभारण्यात येत आहे. पंचकुंआ कब्रस्तानजवळील पुरातन काळातील ब्रीजच्या बाजूला लागून महापालिकेच्या मालकीची जवळपास दोन हजार चौरस फूट जागा होती. सीटीएस क्रमांक ३८३३ याठिकाणी अतिक्रमण करण्यात आले होते. चारही बाजूने लोखंडी पत्रे लावून आत भंगार, लाकूड आदी सामान ठेवण्यात आले होते. महापालिकेने आपल्या मालकीची जागा ताब्यात घ्यावी म्हणून या भागातील दोन नागरिक वर्षभरापासून पाठपुरावा करीत होते. यासंदर्भात प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांचीही नागरिकांनी भेट घेतली होती. त्यांनी त्वरित अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांना जागा ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन शुक्रवारी सकाळी अतिक्रमण हटाव विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
अतिक्रमण करणार्या शेख इलियास या व्यक्तीने कडाडून विरोध दर्शविला. महापालिकेने अगोदरच वेगवेगळ्या पद्धतीने सर्वेक्षण करून ही जागा आपल्या मालकीची आहे किंवा नाही याची शहानिशा केली होती. जागा ताब्यात घेण्यास विरोध होत असल्याचे लक्षात येताच अतिरिक्त आयुक्त स्वतः घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अवघ्या एका तासात जागेचा ताबा घेतला. उपायुक्त अपर्णा थेटे यांना जागा ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली. त्यांनी वॉर्ड अभियंता काशिनाथ काटकर यांना त्वरित जागेच्या चारही बाजूने तार फेंसिंग करण्याचे आदेश दिले. जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाच्या पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, आर. एस. राचतवार, वसंत भोये, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद, पी. बी. गवळी, मालमत्ता विभागाचे मोईन अली, महापालिकेचे पोलीस पथक यावेळी उपस्थित होते.