वाळूजमधील जुनी जलवाहिनी काढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 10:19 PM2019-03-29T22:19:20+5:302019-03-29T22:19:33+5:30
वाळूज ग्रामपंचायतीने नवीन जलवाहिनी टाकल्यामुळे जुनी झालेली जलवाहिनी काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
वाळूज महानगर: वाळूज ग्रामपंचायतीने नवीन जलवाहिनी टाकल्यामुळे जुनी झालेली जलवाहिनी काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. ही जलवाहिनी नवीन वसाहतीत टाकण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे.
वाळूज गावाला एमआयडीसीचा शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीने काही वर्षांपूर्वी ३ इंच व्यासाची अडीच किलोमीटरपर्यंत जलवाहिनी टाकली होती. मात्र, यातून पाणी पुरवठा कमी होत असल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. गतवर्षी एमआयडीसी प्रशासनाकडून वाढीव स्वरुपाचा पाणी पुरवठ्यास मंजुरी देण्यात आल्याने ग्रामपंचायतीने नवीन ६ इंच व्यासाची जलवाहिनी टाकली.
दरम्यान, एमआयडीसी प्रशासनाकडून जुनी जलवाहिनी काढण्याचे आदेश ग्रामपंचायतीला देण्यात आले होते. इतर ग्रामपंचायतींना जलवाहिनी टाकण्यासाठी अडचण निर्माण होत असल्याचे कारण दर्शवत ही जलवाहिनी काढण्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे जुनी जलवाहिनी काढली जात आहे. कर्मचारी व जेसीबी यंत्राच्या मदतीने खोदकाम करुन जुनी जलवाहिनी काढण्यात येत आहे. या जुन्या पाईपचा वापर नवीन वसाहतीत जलवाहिनी टाकण्यासाठी पुनर्वापर केला जाणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी एस.सी.लव्हाळे यांनी सांगितले.