महापालिकेत मिशन ब्लॅकमेलर हटाव!
By Admin | Published: July 27, 2016 12:31 AM2016-07-27T00:31:03+5:302016-07-27T00:53:29+5:30
औरंगाबाद : महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये दलाल, माहिती अधिकाराच्या नावाखाली ब्लॅकमेलिंग करणारे, बोगस पत्रकारांचा सुळसुळाट झाला आहे.
औरंगाबाद : महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये दलाल, माहिती अधिकाराच्या नावाखाली ब्लॅकमेलिंग करणारे, बोगस पत्रकारांचा सुळसुळाट झाला आहे. त्यांच्या वाढत्या कारवायांमुळे अनेक अधिकारी व कर्मचारी त्रस्त झाले आहेत. ब्लॅकमेलिंग करणाऱ्या काही भामट्यांची यादीच तयार करण्याचा निर्णय मंगळवारी एका बैठकीत घेण्यात आला. पोलीस आयुक्तांना ब्लॅकमेलर्सची संपूर्ण कुंडलीच देण्यात येणार आहे.
महापौर त्र्यंबक तुपे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत महापौरांनी सांगितले की, काही अधिकाऱ्यांकडे ब्लॅकमेलर्स खुर्चीवर तासन्तास बसून असतात. नगरसेवक अधिकाऱ्यांच्या कक्षात पोहोचल्यावर त्यांना सन्मानाने वागणूक मिळत नाही. यापुढे एकाही नगरसेवकाला सन्मानाची वागणूक न मिळाल्यास सर्वसाधारण सभा त्यावर कारवाई करेल. उपायुक्त रवींद्र निकम यांनी नमूद केले की, ब्लॅकमेलर्सचा त्रास अलीकडे बराच वाढला आहे. कक्षात बसणेही कठीण झाले आहे. याचा कायमस्वरूपी बंदोबस्त झालाच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
अतिक्रमण विभागाकडे दररोज आणि ठरावीक मंडळींच्याच तक्रारी प्राप्त होतात. तक्रारीची दखल घेऊन मनपा नोटीस बजावते. दरम्यान, तक्रारदार वाटाघाटी करून घेतो. नंतर तक्रारदार स्वत: मनपाला एक पत्र देतो की, माझी संबंधित अतिक्रमणाबद्दल कोणतीही तक्रार नाही. मनपात तक्रारी करून लाखो रुपये कमवण्याचा गोरख धंदाच काही मंडळींनी सुरूकेला आहे. नगररचना विभागातही दिवसभर दलाल फिरताना दिसून येतात. प्रत्येक फाईलची झेरॉक्स या दलालांच्या हातात जातेच कशी असा प्रश्नही महापौरांनी उपस्थित केला.
नगररचना विभागात मागील दोन महिन्यात कोण आला कोणी फायली हाताळल्या सर्व सीसीटीव्ही फूटेज काढा, दररोज माहिती अधिकारात तक्रारी कोणी केल्या त्या अर्जांचा तपशील काढा, नंतर तक्रार नाही म्हणून परत अर्ज देणारे किती आहेत हे बघा. हा सर्व तपशील
पोलीस आयुक्तांना सादर करा असे आदेशही महापौरांनी प्रशासनाला दिले.
बैठकीस सभागृहनेता राजेंद्र जंजाळ, विरोधीपक्षनेता अय्युब जहागीरदार, नगरसेवक राजू वैद्य, गटनेता नासेर सिद्दीकी, भाऊसाहेब जगताप आदींची उपस्थिती होती.
४महापालिकेच्या काही विभागांमध्ये नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपली दाखविण्यात येते. ब्लॅकमेलर्स, माहिती अधिकाराचा शस्त्रासारखा वापर करणाऱ्या मंडळींच्या इशाऱ्यावर कारवाया करण्यात येतात. कधी अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात येते. कधी बांधकाम परवानगी रद्द होते. या मंडळींशी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले नाते आजच तोडावे.
४पोलीस चौकशीत मनपा कर्मचारी दोषी निघाल्यास त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा महापौरांनी दिला.
महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या इशाऱ्यावर दलाल, ब्लॅकमेलर्स नाचत असतात. विभागनिहाय सर्वांचे कॉल डिटेल्स तपासण्याचे कामही महापौरांनी एका अधिकाऱ्यावर सोपविले. दलालांचेही कॉल डिटेल्स काढण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. या कामासाठी पोलिसांची मदत घेण्याचेही निश्चित करण्यात आले.