प्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 04:56 PM2019-12-18T16:56:51+5:302019-12-18T16:58:08+5:30
'कदाचित अजूनही' या कविता संग्रहासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
औरंगाबाद : प्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील यांना यावर्षीचा प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या 'कदाचित अजूनही' या कविता संग्रहासाठी हा पुरस्कार साहित्य अकादमीने जाहीर केला.
आत्मपरा आणि सभोवतालचा परिसर यांचा समतोल साधत असलेल्या त्यांच्या कविता साहित्य प्रेमींना नेहमीच अभ्यास आणि कौतुकाचा विषय राहिलेला आहे. या आधी त्यांचे दिगंत, तरीही, दिवसेंदिवस आणि वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ असे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.दिगंत या त्यांच्या पहिल्या कविता संग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळालेला असून त्यांच्या इतर कवितासंग्रहास सुद्धा अनेक नामवंत पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. साहित्य अकादमीचा पुरस्कार हा साहित्य वर्तुळात अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जातो. या पुरस्काराचे स्वरुप ताम्रपत्र, शाल, आणि एक लाख रुपये रोख रक्कम असे आहे. २५ फेब्रुवारी २०२० रोजी नवी दिल्लीतील एका विशेष कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती साहित्य अकादमीकडून देण्यात आली आहे.
साहित्य अकादमीने २०१९च्या वार्षिक पुरस्काराची घोषणा बुधवारी केली. त्यात २३ भाषांसाठी हे पुरस्कार घोषित करण्यात आले. सात कवितासंग्र, सहा कथासंग्रह, तीन निबंध, एक कथात्तर गद्य आणि आत्मचरित्र आदी साहित्य प्रकारांचा त्यात समावेश आहे. विशेष म्हणजे यातील सात भाषेतील पुरस्कारांसाठी कविता संग्रहाची निवड करण्यात आली आहे. यात डॉ. फुकन च बसुमती (बोडो ) - अखाई अथूमनीफराई, डॉ. नंद किशोर आचार्य ( हिंदी ) - छीलते हुये अपने को, निलबा खांडेकर (कोंकणी ) - द वर्डस, कुमार मनीष अरविंद (मैथिली ) - जिंगिक ओरीअन कराईत, व्ही. मध्सुदन नायर (मल्याळम ) - अचान पिरणा वेदू, पेन्ना मधुसूदन ( संस्कृत ) - प्रजान्चाक्शुश्म यांचा समावेश आहे.