४ 'किमी'साठी २५ रुपयांचे भाडे, अजिंठा लेणीचा प्रवास महागला, पर्यटकात नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2021 07:26 PM2021-10-27T19:26:07+5:302021-10-27T19:27:31+5:30
Ajantha - Ellora Caves : जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणीतील चित्रशैली व शिल्पकलेच्या जतन, संवर्धन व संरक्षणाच्या नावाखाली पर्यटन विभागाने लेणीत खासगी वाहनांना प्रवेश बंद केला आहे.
सिल्लोड/ सोयगाव : जगप्रसिद्ध अजिंठा लेणी ( Ajantha - Ellora Caves ) परिसरात जाण्यासाठी पर्यटकांना फर्दापूर टी-पॉइंट ते अजिंठा लेणी असा चार किलोमीटर अंतराचा एसटीने प्रवास करावा लागतो. मात्र, एसटी महामंडळाने भाडेवाढ केल्याने पर्यटकांना चार किलोमीटर प्रवास करण्यासाठी तब्बल २५ रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे पर्यटक प्रवाशांची एक प्रकारे महामंडळ लूट करीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अजिंठा लेणीत धावणाऱ्या वातानुकूलित बसच्या भाड्यात मात्र महामंडळाने अद्यापपर्यंत कोणतीही भाडेवाढ केलेली नाही. तर विनावातानुकूलित बसचे प्रवास दर वाढल्याने पर्यटकांसह कामगारांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणीतील चित्रशैली व शिल्पकलेच्या जतन, संवर्धन व संरक्षणाच्या नावाखाली पर्यटन विभागाने लेणीत खासगी वाहनांना प्रवेश बंद केला आहे. त्यामुळे अजिंठा लेणी भेटीवर आलेल्या पर्यटकांना व लेणीत काम करणाऱ्या कामगारांना त्यांची खासगी वाहने फर्दापूर टी-पॉइंट येथे उभी करावी लागतात. तेथून महामंडळाच्या बसमधून फर्दापूर टी पॉइंट ते अजिंठा लेणी हा चार किमीचा प्रवास करावा लागतो.
सीएनजीच्या नावाने साधी बस
अजिंठा लेणीत गेल्या १५ वर्षांपासून खासगी वाहनांना बंदी करण्यात आली. त्याऐवजी सीएनजी बस चालविल्या जातील अशी घोषणा राज्यकर्त्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या. मात्र, आजपर्यंत सीएनजी बस आलीच नाही. आधी शटल बस होत्या. आता एशियाड व शिवशाही बस चालविल्या जात आहेत. तीनपट भाडे वसूल केले जात आहे.
एक प्रकारे पर्यटकांची लूट
महामार्गावर आकारल्या जाणाऱ्या बसभाड्यापेक्षा अजिंठा लेणीत धावणाऱ्या बसचे भाडे आधीच दुपटीने वाढविले आहे. त्यात मंगळवारपासून पुन्हा येथील विनावातानुकूलित बसच्या भाड्यात ५ रुपयाने वाढ करण्यात आल्याने अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांसह कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही भाडेवाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
डिझेलचे भाव वाढले
डिझेलचे भाव वाढले म्हणून ही भाडेवाढ करण्यात आली आहे. हा निर्णय वरिष्ठ पातळीवरून झाला आहे. विशेष बस चालवल्या, त्या बस दुसरीकडे जात नाहीत. कधी कधी कमी प्रवासात बस सोडावी लागते म्हणून भाडे जास्त आहे.
- डी. एन. वाढेकर, प्रभारी वाहतूक नियंत्रक, अजिंठा लेणी