Aurangabad Violence : भाडेकरूंची दुकाने जाळली की जळाली?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 01:35 AM2018-05-14T01:35:29+5:302018-05-14T10:38:51+5:30
दंगलखोरांनी जाळलेल्या दुकानातील बहुतांश दुकाने ही पोटभाडेकरूंची असल्याचे पाहणीत दिसून आले आहे. मालक आणि पोटभाडेकरूंच्या वादामुळे दंगलीत पोटभाडेकरूंचीच दुकाने जाळण्यात आली की जाळली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दंगलखोरांनी जाळलेल्या दुकानातील बहुतांश दुकाने ही पोटभाडेकरूंची असल्याचे पाहणीत दिसून आले आहे. मालक आणि पोटभाडेकरूंच्या वादामुळे दंगलीत पोटभाडेकरूंचीच दुकाने जाळण्यात आली की जाळली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
नवाबपुरा, राजाबाजार, शहागंज, चमन चौक आणि गुलमंडीवर शेकडो दुकाने जाळण्यात आली आहे. यातील बहुतांश दुकाने अनेक वर्षांपासून पोटभाडेकरूंची आहेत. दंगलग्रस्त भागात कोणत्याही ठिकाणी सलगपणे जाळपोळ करण्यात आलेली नाही. टिपून टिपून दुकाने जाळण्यात आलेली असल्याचे एकूण सर्व जाळपोळीतून दिसून येत आहे. दंगलग्रस्त भागातील बहुतांश दुकाने ही एका गटातील मालकीची होती, तर पोटभाडेकरू दुसऱ्या गटातील आहेत. दुकाने खाली करणे, भाडे वाढविणे यातून मालक आणि पोटभाडेकरू यांच्यात सतत वाद होत होते. मात्र, पोटभाडेकरू काहीही झाले तरी दुकान खाली करत नव्हते. यातून दंगलीमध्ये पोटभाडेकरूंचीच दुकाने जाळण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.
दुकाने खाली करण्यासाठी सुपारी
या भागातील मालकांनी पोटभाडेकरूंनी दुकाने खाली करण्यासाठी सुपारी दिली असल्याचेही बोलले जात आहे. दुकाने खाली करण्यासाठी मागील सहा महिन्यांपासून काहीजण प्रयत्न करीत होते. मात्र, यात यश मिळाले नव्हते. गांधीनगरात झालेल्या वादाचा फायदा घेत या भागात दंगल भडकवली. या दंगलीचा फायदा घेत अडचण वाटणा-या पोटभाडेकरूंची दुकाने जाळण्यात आली. याविषयी सर्व माहिती पोलीस तपासात पुढे येईल, असेही काही पोटभाडेकरूंनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.