घर विक्री केल्यानंतर भाड्याने घेतले, आता ताबाही सोडेना
By राम शिनगारे | Published: April 14, 2024 09:14 PM2024-04-14T21:14:17+5:302024-04-14T21:14:30+5:30
२७ लाख रुपयांची फसवणूक : जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : दोन मजली घर एकास २७ लाख रुपयांना विकले. त्या घराचे खरेदी खत तयार करून दिले. मात्र, पैसे मिळाल्यानंतर काही दिवसासाठी तेच घर भाड्याने विकत घेणाऱ्याकडून घेतले. भाडे थकविल्यानंतर घरामालकाने घराचा ताबा सोडण्यास सांगितले, असता त्यांनाच धमकी देऊन घर खाली करण्यास नकार दिला. या प्रकरणी २७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा जवाहरनगर पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.
संतोष दामोदर कस्तुरे (रा. विष्णुनगर) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी रघुनाथ एकनाथ औताडे (रा. हर्सुल) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विष्णुनगरातील ६९० चौ.फु.च्या प्लॉटवर दोन मजली घर बांधलेले आहे. हे घर आराेपी संतोष कस्तुरे याने ११ मार्च २०१९ रोजी फिर्यादीस २७ लाख रुपयांमध्ये विक्री केले. त्याची नोटरी खरेदी खत करून दिले. घर विक्री केल्यानंतर हे घर काही दिवसांसाठी मला भाड्याने राहण्यासाठी द्या, असे म्हणून त्याने औताडे यांच्याकडून ते घर भाड्याने घेतले. त्यासाठी लागणारा भाडे करारनामाही करून दिला. मात्र, घरभाडे देण्यास कस्तुरेकडून टाळाटाळ होऊ लागल्याने औताडे यांनी त्याला घर रिकामे करण्यास सांगितले, मात्र त्याने टाळाटाळ केली. हे घर तुमचे नाही, तुम्ही इथे येऊ नका, तुम्हांला काय करायचे ते करा, परत इथे आला तर तुम्हांला पाहून घेतो, तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करेल, अशा पद्धतीच्या धमक्या दिल्या. तसेच पत्नीला सांगून तुमच्याविरोधात विनयभंगाची केस दाखल करण्याची धमकी दिली., कस्तुरे याने विश्वासघात केल्याचे लक्षात आल्यावर औताडे यांनी १३ एप्रिल २०२४ रोजी जवाहर नगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सूरज बंडगर हे करत आहे.