रेणूने दिला दोन पिलांना जन्म; पिलांची प्रकृती ठणठणीत
By Admin | Published: September 11, 2016 01:05 AM2016-09-11T01:05:41+5:302016-09-11T01:24:02+5:30
औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात शनिवारी सकाळी ‘रेणू’या बिबट्या मादीने दोन पिलांना जन्म दिला.
औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात शनिवारी सकाळी ‘रेणू’या बिबट्या मादीने दोन पिलांना जन्म दिला. रेणू आणि दोन्ही पिल्लं अगदी ठणठणीत असून, सुरक्षेच्या दृष्टीने रेणूजवळ जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सहा महिन्यांपूर्वी प्राणिसंग्रहालयातील डॉ. बी. एस. नाईकवाडे यांच्या निष्काळजीपणामुळे रेणूच्या तीन पिलांचा मृत्यू झाला होता. मागील अनुभव लक्षात घेऊन मनपा प्रशासन रेणूच्या बाबतीत कोणतीही रिस्क घेण्यास तयार नाही.
१७ फेबु्रवारी २०१६ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथून बिबट्याची एक जोडी औरंगाबादेत आणण्यात आली. रेणू आणि राजा यांना ४०७ मेटॅडोरने ८०० किलोमीटरचा प्रवास घडवून आणण्यात आले होता. रेणू गरोदर असताना तिला हा धोकादायक प्रवास घडवून आणण्यात आला. सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात तिला आणल्यानंतर तिने अन्न, पाणी घेणे सोडले. प्राणिसंग्रहालयाचे तत्कालीन संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी तिला गॅस्ट्रो झाला असावा म्हणून चुकीचे औषधोपचार सुरू केले. त्यामुळे नियोजित वेळेपूर्वीच रेणूने तीन पिलांना जन्म दिला. या पिलांची योग्य निगाही न राखल्याने अवघ्या २४ तासांत त्यांचा मृत्यू झाला होता. रेणूच्या पिलांचे मृत्यू प्रकरण राज्यभर गाजले होते. या प्रकरणात गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला. चौकशीत डॉ. नाईकवाडे दोषी असल्याचे दिसून आले. त्यामुळे मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी त्यांना तडकाफडकी निलंबित केले.
नाईकवाडे यांच्या जागी एक निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी कंत्राट पद्धतीवर नेमण्यात आला आहे. त्याचप्रमाणे उद्यान अधीक्षक विजय पाटील यांच्याकडे प्राणिसंग्रहालय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. जुने दु:ख विसरून रेणू पुन्हा उद्यानात मागील काही दिवसांपासून राजासोबत खेळत-बागडत होती. अलीकडेच तिला पुन्हा गर्भधारणा झाली होती. ही बाब प्राणिसंग्रहालय विभागाने गोपनीय ठेवून तिच्यावर योग्य औषधोपचार सुरू ठेवले.
शनिवारी सकाळी ११ वाजता रेणूने दोन गोंडस पिलांना जन्म दिला. सध्या सुरक्षेच्या कारणावरून तिच्याजवळ कोणालाही जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मार्च २०१६ मध्ये रेणूच्या तीन पिलांचा मृत्यू झाल्यानंतर तिला मोठा मानसिक धक्का बसला होता. तिने काही दिवस अन्नत्यागही केला होता. डॉक्टरांच्या अथक परिश्रमानंतर रेणू काही दिवसांनंतर नॉर्मल झाली होती. मनपा प्रशासन रेणूच्या बाबतीत रिस्क घेण्यास तयार नाही. तिला सर्वोत्तम औषधोपचार आणि सेवा देण्यात येत असल्याचे सूत्रांनी नमूद केले.