काकडेवाडीच्या कोल्हापुरी बंधाऱ्याची दोन वर्षांपासून रखडली दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:05 AM2021-07-27T04:05:46+5:302021-07-27T04:05:46+5:30
भराडी : सिल्लोड तालुक्यातील पूर्णा नदीवरील काकडेवाडी (धानोरा) जवळील पुरात वाहून गेलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती गेल्या दोन वर्षांपासून रखडली ...
भराडी : सिल्लोड तालुक्यातील पूर्णा नदीवरील काकडेवाडी (धानोरा) जवळील पुरात वाहून गेलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती गेल्या दोन वर्षांपासून रखडली आहे. याबाबत गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार करून देखील दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही लाखो लीटर पाणी वाया जाणार आहे.
अखेर ओलिताखाली येणाऱ्या शेतीवर त्याचा परिणाम होणार आहे. एकीकडे तालुक्यातील विकासकामांसाठी करोडो रुपयांचा निधी मंजूर केला जात आहे. मग या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे पैसे नाही का? असा प्रश्न येथील शेतकऱ्यांकडून केला जात आहे. दरवर्षी या परिसरातील शेतकरी लोखंडी दरवाजे बसवून वाहून जाणारे पाणी अडवत होते. यामुळे याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी होत होता.
शिवाय सिसारखेडा, पळशी, धानोरा, वांजोळा या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनाही होत होता. परंतु २०१९ मध्ये तालुक्यात सलग २३ दिवस धो-धो पाऊस झाला. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यातच हा कोल्हापुरी बंधारा एका बाजूने वाहून गेला. गेल्या दोन वर्षांपासून बंधाऱ्याच्या दुरुस्तीची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. सिंचन विभागाने पाहणी करून जिल्हा परिषदेला दुरुस्तीचा प्रस्ताव दिलेला आहे. परंतु दोन वर्षांपासून प्रस्ताव धूळखात पडून आहे.
--
दुग्ध व्यावसायिकांना सर्वाधिक त्रास
हा कोल्हापुरी बंधारा वाहून गेल्याने लाखो लिटर पाणी वाया तर जातच आहे, शिवाय जाण्या-येण्याचा मार्गही बंद पडला आहे. या परिसरातील काही शेतकऱ्यांच्या शेती या नदीच्या दोन्ही काठावर आहे. कोल्हापुरी बंधाऱ्यावरून ये-जा करीत होते. परंतु बंधारा वाहून गेल्याने या शेतकऱ्यांचा जीव धोक्यात घालून नदीतील पाण्यातून मार्ग काढत ये- जा करावी लागत आहे. याचा सर्वाधिक त्रास दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
-------
फोटो : धानोरा काकडेवाडी येथील कोल्हापुरी बंधाऱ्याची तीन वर्षांपूर्वी झालेली दुरवस्था.
260721\ec47298c29964a868dc65bb154bbbd30_1.jpg
काकडेवाडीच्या बंधाऱ्याला बांधकामाची प्रतीक्षा