पाणीपुरवठा सुरू ठेवून मनपाने केली जलवाहिनीची दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:05 AM2021-05-12T04:05:27+5:302021-05-12T04:05:27+5:30
औरंगाबाद : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या ७०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीला मंगळवारी पहाटे पैठण रोडवरील इसारवाडी गावाजवळ लागलेली गळती ...
औरंगाबाद : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या ७०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीला मंगळवारी पहाटे पैठण रोडवरील इसारवाडी गावाजवळ लागलेली गळती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणीपुरवठा बंद न करताच दुरुस्त केली.
सकाळीच हाती घेतलेले दुरुस्तीचे काम मोठ्या कसरतीने सायंकाळी ७ वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आले. उपसा बंद न केल्याने पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
सध्या उन्हाळ्याचे दिवस, त्यातच लॉकडाऊनमुळे नागरिक घरातच असून पाण्याचा वापर वाढला आहे. परिणामी, मागणीदेखील वाढली आहे. मागणीच्या प्रमाणात दोन्ही नवीन १४०० व जुन्या ७०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्याद्वारे पाण्याचा उपसा करून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना रात्रंदिवस तारेवरची कसरत करावी लागत आहे. मंगळवारी पहाटे इसारवाडी गावाजळील जुन्या वाहिनीच्या व्हॉल्व्हला मोठी गळती लागली. मागील काही दिवसांपासून ही गळती कमी होती. मात्र, मंगळवारी ती अधिकच वाढली. गस्तीवर असणाऱ्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात घेताच त्यांनी पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता किरण धांडे यांना माहिती दिली. पाण्याचा उपसा सुरूच ठेवून गळती बंद करण्याचे काम सुरू करण्यात आले. व्हॉल्व्हभोवती खड्डा खोदून त्यातील पाणी बाहेर काढण्यासाठी १० एचपीच्या दोन व ५ एचपीची एक अशा तीन मोटारी लावल्या होत्या. मंगळवारी रात्री ७.३० वाजेपर्यंत हे काम पूर्ण झाले. जलवाहिनी बंद केली नसल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यावर याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे धांडे यांनी सांगितले.