हळदीच्या आधी रिपोर्ट धडकला; मंगल कार्यालय सोडून वऱ्हाडी पोहोचले थेट कोरोना वॉर्डात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 02:32 PM2020-11-30T14:32:23+5:302020-11-30T14:33:48+5:30
कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वजण काळजी घेत लग्नाच्या आनंदात हरखून गेले होते.
औरंगाबाद : लग्नाची तयारी झाली. नवरदेवाला हळद लागणार त्या आधीच नवरदेवाकडील १५ नातेवाईकांना कोरोनाने घेरले आणि ज्यांना दोन दिवसांनी वरात घेऊन मंगल कार्यालयात जायचे होते ते वऱ्हाडी उपचारासाठी कोरोना सेंटरमध्ये जाऊन पोहचले.
सिडको एन ६ परिसरातील एका मुलाचे लग्न २७ नोव्हेंबर रोजी ठरले होते. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वजण काळजी घेत लग्नाच्या आनंदात हरखून गेले होते. दोन दिवसांवर लग्न आले होते. नवरदेवाला हळद लागणार होती. परिवारातील गृहिणी व मुली मेहंदी काढत होत्या. सर्व विधी आटोपून मंगल कार्यालयात जाण्याची तयारी सुरू होती. तेवढ्यात परिवारातील काका व त्यांच्या मुलाची कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. आणि सर्व परिवार हादरून गेला. नवरदेव सोडून परिवारातील १५ सदस्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. संपूर्ण परिवार नवरदेवाची वरात घेऊन मंगल कार्यालयात जाण्यासाठीची तयारी करत होते. अखेर त्या सर्वांवर कोरोना उपचार केंद्रात जाण्याची पाळी आली.
केंद्रातच पुढील लग्न तिथीचे नियोजन
यामुळे २७ तारखेला होणारे लग्न ऐनवेळेवर पुढे ढकलण्यात आले. सर्व नातेवाईकांना फोनवर कळविण्यात आले. मेसेज टाकण्यात आले. आता नवरदेवाचे वडील- आई, बहिणी, काका, काकू अन्य नातेवाईक कोरोना केंद्रात लग्नाची पुढील नियोजन करत आहेत.