नावानिशी तक्रार द्या, निलंबित करू...शिक्षणाधिकारी जैस्वाल यांची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 03:48 PM2018-06-04T15:48:12+5:302018-06-04T15:50:56+5:30
खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे ज्या शिक्षकांची बदली झाली आहे, अशा शिक्षकांची नावानिशी तक्रार करा. त्याची शहानिशा करून दोषींना तात्काळ निलंबित केले जाईल, असे शिक्षणाधिकारी एस.पी. जैस्वाल म्हणाले.
औरंगाबाद : बदल्यांमध्ये अन्याय झाला, ज्येष्ठता याद्या जाहीर केल्या नाहीत, बोगस प्रमाणपत्रे तपासली नाहीत, शिक्षकांनी असे चुकीचे आरोप करू नयेत. खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे ज्या शिक्षकांचीबदली झाली आहे, अशा शिक्षकांची नावानिशी तक्रार करा. त्याची शहानिशा करून दोषींना तात्काळ निलंबित केले जाईल, असे शिक्षणाधिकारी एस.पी. जैस्वाल म्हणाले.
बदलीमुळे अन्याय झालेल्या शिक्षकांची बैठक शनिवारी औरंगाबाद शिक्षक सोसायटी कार्यालयात झाली. या बैठकीत शिक्षकांनी केलेल्या आरोपांचे खंडण करताना शिक्षणाधिकारी जैस्वाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, जिल्ह्यातील ८ हजार शिक्षकांनी बदलीसाठी आॅनलाईन अर्ज केले होते. यापैकी साडेतीन हजार शिक्षकांच्या बदल्या झाल्या. बदली झालेल्या शिक्षकांची एवढी मोठी संख्या असून कोणाकोणाची प्रमाणपत्रे तपासायची. बिनबुडाचे आरोप न करता आमच्याकडे थेट नावानिशी तक्रार द्या, त्याची विनाविलंब चौकशी करू व दोषी आढळल्यास, त्या शिक्षकाला तात्काळ निलंबित करू.
मराठवाडा शिक्षक कृती समितीचे निमंत्रक दिलीप ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शेकडो शिक्षकांनी बदली प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे गा-हाणे मांडले. पती-पत्नी शिक्षक, कनिष्ठ शिक्षक तसेच एकल शिक्षकांवर अन्याय झाले आहेत. संवर्ग- १ व संवर्ग- २ मध्ये अनेक शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्रांच्या माध्यमातून, तर अनेकांनी चुकीचे अंतर दाखवून बदलीचा लाभ घेतलेला आहे. बदली करताना शिक्षकांची सेवाज्येष्ठता ग्राह्य धरण्यात आलेली नाही, असे आरोप पुराव्यासह शिक्षकांनी केले.
बोगस प्रमाणपत्रांची चौकशी करा
संवर्ग- १, २ व ३ मध्ये बदली झालेल्या शिक्षकांची शारीरिक चाचणी मेडिकल बोर्डामार्फत करावी. संवर्ग- २ मध्ये पती-पत्नी शिक्षकांच्या शाळांचे अंतर ३० किमीपेक्षा कमी असताना ते जास्त दाखवून बदलीचा लाभ घेतलेला आहे. याची सत्यता पडताळावी व दोषींवर कठोर कारवाई करावी. चुकीच्या बदल्या त्वरित रद्द कराव्यात व त्यांच्या ठिकाणी विस्थापित शिक्षकांची बदली करण्यात यावी, कायमस्वरूपी रिक्त ठेवलेल्या जागा विस्थापित शिक्षकांना देण्यात याव्यात, या मुद्यांवर शिक्षकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.