सरकारला शेतकऱ्यांच्या सर्व्हेचा अहवाल देणार; स्वेच्छानिवृत्तीनंतर केंद्रकर पायी गेले निवासस्थानाकडे
By विकास राऊत | Published: July 4, 2023 12:20 PM2023-07-04T12:20:59+5:302023-07-04T12:21:37+5:30
आयुक्तालय ते जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे गुलशन महल या शासकीय निवासस्थानापर्यंत नागरिकांनी हे दृश्य मोबाइलमध्ये कैद केले.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या असून त्यावर उपाययोजनांसाठी आजवर केलेले सर्व प्रयत्न वाया गेल्यानंतर माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी विभागातील २१ लाख शेतकरी कुटुंबांचा सर्व्हे केला आहे. बळीराजा सर्व्हेअंतर्गत तो सर्व्हे असून, हा प्रश्न पूर्णपणे धसास लावणारच, असे मत केंद्रेकर यांनी सोमवारी व्यक्त केले.
त्या सर्व्हेचे विश्लेषण पूर्ण होण्यापूर्वीच दोन्ही हंगामांत एकरी २० हजार रुपये रोख शेतकऱ्यांना देण्याची सूचना सरकारला करण्याचे वक्तव्य केंद्रेकर यांनी १६ मे रोजी केले होते. त्यानंतर, त्यांनी २४ मे रोजी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला. तो शासनाने मंजूर केल्यानंतर, ३ जुलै रोजी केंद्रेकर यांनी पदभार सोडला. आयुक्तालयातून केंद्रेकर सपत्नीक विनावाहन पायी गुलशन महलपर्यंत गेले. सोबत जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, महसूल उपायुक्त पराग सोमण आदी अधिकाऱ्यांचा लवाजमाही पायीच निघाला. आयुक्तालय ते जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे गुलशन महल या शासकीय निवासस्थानापर्यंत नागरिकांनी हे दृश्य मोबाइलमध्ये कैद केले. दिवसभरात अनेक सनदी अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली.
पुढच्या आठवड्यात अहवाल शासनाकडे...
कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेअभावी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष प्रशासनाने काढला आहे. सर्व्हे पूर्ण झाला असून, अंतिम निष्कर्षासह शेतकऱ्यांना दोन्ही हंगामांत एकरी दहा हजार रुपयांचे अर्थसाहाय्य करण्याची शिफारस करण्याचा अहवाल पुढच्या आठवड्यात शासनाकडे देण्यात येणार आहे.
सर्व्हेमधून काय दिसले?
शेतकऱ्यांची मानसिकता कशी आहे, यावरून शेतकरी आत्महत्या करू शकतो का, याचा अंदाज आला आहे. मुली लग्नाला आल्या आहेत, आर्थिक परिस्थिती वाईट आहे, कर्ज आहे. याचे विश्लेषण करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्येचा विचार आहे, त्यांना बोलावून समुपदेशन करण्यात येईल.
असा केला सर्व्हे.....
बारा विभागातील १०४ प्रश्नांची माहिती भरून घेतली आहे. आत्महत्येचा विचार येणाऱ्या शेतकऱ्यांची वेगळी यादी आहे. शेतकऱ्यांची कौटुंबिक माहिती, आर्थिक अडचण, कर्ज, कलह, व्यसन, बेरोजगारांची संख्या इ. प्रश्नांची माहिती संकलित करण्यात आली.
शेती, पर्यावरणात रमणार- केंद्रेकर
शेती, शेतकरी पर्यावरणात रमणार असल्याचे केंद्रेकर म्हणाले. नोकरीमुळे जगायचे राहून गेले आहे. एकच मुलगा असून, तो मोठा होऊन परदेशात कधी गेला, हे समजलेही नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी काम करायचे आहे. वाचन, चित्रकला, भटकंती, निसर्गाच्या सान्निध्यात पुढील काळ घालविणार असल्याचे त्यांनी सांगितले.