औरंगाबाद जिल्ह्यातील मतदार पळवापळवीचा घोळ ३१ आॅक्टोबरपूर्वी कळवा : जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 12:32 PM2018-09-08T12:32:56+5:302018-09-08T12:33:55+5:30
निवडणुकीदरम्यान मतदारांच्या पळवापळवीबाबत अनेक तक्रारी येतात. त्याबाबत ३१ आॅक्टोबरपूर्वी तक्रार करावी
औरंगाबाद : लोकसभा निवडणुका सात महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने सर्वतोपरी तयारी सुरू केली असून, प्रारूप मतदार याद्यांच्या कामाला गती आली आहे. निवडणुकीदरम्यान मतदारांच्या पळवापळवीबाबत अनेक तक्रारी येतात. त्याबाबत ३१ आॅक्टोबरपूर्वी तक्रार करावी, त्यानंतर कुणाचे काहीही ऐकून घेतले जाणार नाही, असे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले, मतदारांना स्थलांतरित होण्याचा अधिकार आहे. त्यानुसार मतदार स्थलांतरित झाले तर ते बेकायदेशीर नाही; परंतु मोठ्या संख्येने जर तो आकडा असेल, तर त्याबाबत ३१ आॅक्टोबरपूर्वी आक्षेप घेतला, तर प्रशासन कारवाई करील. मतदार याद्या अंतिम करण्यासाठी कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. याद्यांमध्ये तेथेच घोळ होतो, असे पत्रकारांनी विचारले असता, जिल्हाधिकारी म्हणाले, त्यासाठीच ३१ आॅक्टोबरची मुदत आक्षेपासाठी आहे. १ सप्टेंबर २०१८ ते ४ जानेवारी २०१९ पर्यंत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. ४ जानेवारी २०१९ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
एप्रिलमध्ये निवडणूक
पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. विधानसभा निवडणुकांची तारीख निश्चित नाही. ईव्हीएमद्वारे निवडणुका होणार असून, त्यासाठी प्रशिक्षण पार पडले. २ हजार ९५७ मतदान केंद्रांसाठी ५७४३ मतदान युनिट आणि ३ हजार ७३९ नियंत्रण युनिट जिल्ह्यात असतील. बेल या कंपनीचे अभियंते ते यंत्र तपासून सील करतील. ही प्रक्रिया सामान्य नागरिक ते लोकप्रतिनिधींसाठी पाहता येईल. २५ दिवस हा कार्यक्रम इन कॅमेरा असेल. यानंतर यंत्र सील केल्यावर, मतदारसंघात गेल्यावर ईआरओ तपासतील. त्यामुळे यंत्रांणा छेडछाड होणार नाही.