मोकाट कुत्र्यांचा दर महिन्याला द्यावा लागणार जि.प.ला अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:42 AM2018-04-25T00:42:58+5:302018-04-25T00:43:31+5:30
ग्रामीण भागातील मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा अहवाल आता दर महिन्याला जिल्हा परिषदेला देण्याचे आदेश सोयगाव तालुक्यातील ग्रामसेवकांना मंगळवारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व उपायुक्त (विकास) यांनी दिले. या आदेशाने ग्रामीण भागातील कुत्र्यांचा बंदोबस्त लागणार असून, कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये पसरलेली दहशत यामुळे कमी होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सोयगाव : ग्रामीण भागातील मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा अहवाल आता दर महिन्याला जिल्हा परिषदेला देण्याचे आदेश सोयगाव तालुक्यातील ग्रामसेवकांना मंगळवारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व उपायुक्त (विकास) यांनी दिले. या आदेशाने ग्रामीण भागातील कुत्र्यांचा बंदोबस्त लागणार असून, कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये पसरलेली दहशत यामुळे कमी होणार आहे.
मनुष्य आणि कुत्रा यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण घालण्याचे आदेश ग्रामसेवकांना देण्यात आल्याने ग्रामसेवकांची पुन्हा गावपातळीवरील जबाबदारी वाढली आहे. दरम्यान, भटक्या कुत्र्यांमुळे निर्माण होणाऱ्या वाढत्या समस्यांकरिता राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात येऊन त्याखाली संबंधित जिल्हा परिषदेची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे.
या उपसमितीचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी हे राहतील तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, उपायुक्त (विकास) आदींचा या समितीत समावेश आहे. सोयगाव शहर आणि तालुक्यात भटक्या व मोकाट कुत्र्यांची मोठी दहशत पसरली आहे. यातून आता सुटका होण्याची चिन्हे दिसत असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, कुत्रे चावल्यास तालुक्यात कुठेच सहज उपचार मिळत नसल्याने अनेकांना जळगाव येथील रुग्णालय गाठावे लागते.
दरमहा गावनिहाय भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाटाबाबत ग्रामसेवकांना जिल्हा परिषदेला अहवाल द्यावयाचा आहे.
यासाठी संबंधित गावांच्या ग्रामसेवकांनी पुढाकार घेण्याचे आदेशात म्हटले आहे.