जिल्ह्यात पुनर्वसूची दमदार हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:37 AM2017-07-18T00:37:56+5:302017-07-18T00:39:58+5:30
नांदेड: शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला होता. गत दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे पिके तरारली असून शेतकरी आनंदी दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: मृग नक्षत्राच्या पावसावर जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. उगवणही बऱ्यापैकी झाली मात्र परंतु तब्बल २० दिवस पावसाने ओढ दिल्यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले होते. त्यामुळे शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला होता. गत दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे पिके तरारली असून शेतकरी आनंदी दिसून येत आहे.
५ जुलै रोजी पुनर्वसू नक्षत्रास प्रारंभ झाला. नक्षत्राचे वाहन कोल्हा असल्यामुळे पाऊस पडेल की नाही म्हणून शेतकरी संभ्रमात होते. मात्र पुनर्वसू नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतीत पाणीच पाणी झाले. रविवारी रात्री जिल्हाभरात पावसाने जोरदार बॅटिंग केली़ त्यानंतर सोमवारी सकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर संततधार सुरु होती़ कंधार, माहूर, अर्धापूर, नांदेड, नायगाव, भोकर आदी भागांत पावसाचा चांगला जोर होता़ दुपारी चार वाजेनंतर मात्र पावसाने उघडीप दिली होती़ रात्री मात्र जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची रिपरिप सुरु होती़ शहरात महापालिकेने पावसाळापूर्व कामेच केली नसल्यामुळे त्याचा फटका नागरिकांना बसत आहे़ पावसामुळे शहरातील सर्व रस्ते जलयम झाले होते़ जुना मोंढा, लालवाडी, मगनपुरा, देगलूर नाका, लेबर कॉलनी इ. सखल भागांत नागरिकांच्या घरांत पावसाचे पाणी शिरले होते़ त्याचबरोबर मुख्य चौक असलेल्या महावीर चौक, मोर चौक, भावसार चौक, श्रीनगर आदी भागात रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले होते़ त्यामुळे नांदेडकरांना चांगलीच कसरत करावी लागली़
शेतीला मात्र या पावसाचा चांगला फायदा झाला असून सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर, ज्वारी आदी पिके हातची जाणार अशी परिस्थिती निर्माण झाली असताना हा पाऊस संजीवनीच ठरल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून उमटत आहेत. मात्र तरीही अजून मोठ्या पावसाची गरज आहे. सध्या सोयाबीन, मूग, उडीद ही पिके फुलोऱ्यात येण्याची वेळ असल्यामुळे या पिकांना हा पाऊस पोषक ठरणार आहे. मात्र कापूस व तूर ही दीर्घकालीन पिके असल्यामुळे त्यांना अजून पावसाची गरज आहे. ओढे-नाले खळाळले असले तरी जिल्ह्यातील एकाही नदीला मोठा पूर आला नाही.
पुनर्वसू नक्षत्र दोन दिवसानंतर संपणार असून १९ जुलै रोजी पुष्य नक्षत्रास प्रारंभ होणार असल्याने या नक्षत्रातही दमदार पाऊस होईल, अशी आशा आहे़