अनियमितता करणाऱ्या अधिकाऱ्यांचा लोकप्रतिनिधींना लळा

By Admin | Published: February 16, 2016 11:42 PM2016-02-16T23:42:11+5:302016-02-16T23:44:21+5:30

परभणी : जिल्ह्याच्या विकासासाठी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी विकासप्रिय अधिकाऱ्यांची पाठराखण करणे अपेक्षित असताना परभणी जिल्ह्यात मात्र वेगळेच चित्र पहावयास मिळत आहे.

Representatives of irregularities | अनियमितता करणाऱ्या अधिकाऱ्यांचा लोकप्रतिनिधींना लळा

अनियमितता करणाऱ्या अधिकाऱ्यांचा लोकप्रतिनिधींना लळा

googlenewsNext

परभणी : जिल्ह्याच्या विकासासाठी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी विकासप्रिय अधिकाऱ्यांची पाठराखण करणे अपेक्षित असताना परभणी जिल्ह्यात मात्र वेगळेच चित्र पहावयास मिळत आहे. काही लोकप्रतिनिधींना विकासकामांमध्ये अनियमितता करणाऱ्या अधिकाऱ्यांचा लळा लागल्याचे पहावयास मिळत आहे़ अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालून उखळ पांढरे करून घेण्याचा केवीलवाणा प्रयत्न होत असल्याने विकास कामांचा बट्ट्याबोळ होत आहे़ परिणामी जिल्ह्याचे मोठे नुकसान होत आहे़
मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत परभणी जिल्हा विकासामध्ये कोसोदूर राहिला आहे़ परभणीपासूनच निर्माण झालेल्या हिंगोली जिल्ह्याने प्रगती केली असली तरी परभणी जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींच्या कचखाऊ व स्वार्थी वृत्तीमुळे जिल्ह्याचा म्हणावा तसा विकास झालेला नाही़ पक्ष निष्ठा नाही, वैचारिक भूमिकेशी बांधिलकी नाही़ नेहमीच तडजोड, सकाळी एका व्यासपीठावर तर रात्री दुसऱ्याच बैठकीत अशी भूमिका आतापर्यंत जिल्ह्यातील काही नेते मंडळींनी घेतल्याने जिल्ह्याचा विकास झाला नाही़ चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात आणि प्रशासकीय कामकाजात अनियमितता करणाऱ्या अधिकाऱ्यांना लळा लावला जातो़ महसूल विभाग असो की, सार्वजनिक बांधकाम विभाग की जिल्हा परिषद विविध विभागात अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे़
सद्य:स्थितीत जिल्हा परिषदेतील अधिकारी चर्चेत आहेत़ मिनी मंत्रालय असलेल्या या विभागात अधिकारीस्तरावर गोंधळ आहे़ रोजगार हमी योजनेच्या कामावरून जिंतूर, सेलू, पूर्णा येथील गटविकास अधिकाऱ्यांना काम करू दिले जात नाही़ सातत्याने त्यांच्यावर दबाव टाकून अनियमित कामे करण्यासाठी गळ घातली जाते़ त्यामुळे येथील गटविकास अधिकारी अनेकदा रजेवर गेले आहेत़ दुसरीकडे येथील पदभार मर्जीतील अधिकाऱ्यांना देण्याची खटाटोप लोकप्रतिनिधींकडून केली जाते़
याबाबीला विरोधही कोणी करीत नाही, याबद्दल आश्चर्यच आहे़ वर्ग १ च्या अधिकाऱ्यांचा पदभार थेट वर्ग ३ च्या कर्मचाऱ्याला देण्याचा प्रकार जिल्हा परिषदेत घडला़ परंतु, त्याला आक्षेप कोणी घेतला नाही़ ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कनिष्ठ अधिकाऱ्यांना मानसिक बळ द्यायचे असते ते अधिकारी मूग गिळून गप्प बसले़ परिणामी बेवारस झालेल्या काही प्रामाणिक अधिकाऱ्यांनी रजेवर जाणे पसंत केले़ जिल्हास्तरावरील वरिष्ठ अधिकारी दखल घेत नसताना विभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी तरी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेणे अपेक्षित आहे़ परंतु, विभागीयस्तरापर्यंत या बाबतचा आवाज पोहचूनही चकार शब्द या अधिकाऱ्यांनी काढलेला नाही़ त्यामुळे प्रामाणिक अधिकाऱ्यांचे खच्चीकरण झाले आहे़ यातूनच पुन्हा काही स्वार्थी लोकप्रतिनिधी आपला डाव साधत आहेत़ (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Representatives of irregularities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.