रिपब्लिकन विद्यार्थी सेनेची संजय निंबाळकरांवर शाईफेक; विद्यापीठाच्या विभाजनास केला विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 03:44 PM2022-05-27T15:44:14+5:302022-05-27T16:57:59+5:30
विद्यापीठाचे विभाजन करून उस्मानाबादला स्वतंत्र विद्यापीठ करण्याच्या मागणीला आंबडेकरी संघटनांचा विरोध
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्राला स्वतंत्र विद्यापीठ करण्याच्या मागणीचा वाद आता पेटला आहे. स्वतंत्र विद्यापीठाची मागणी लावून धरणारे व्यवस्थापन सदस्य संजय निंबळकर यांच्यावर रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत शाईफेक करत विद्यापीठ विभाजनास विरोध दर्शवला.
उस्मानाबाद उपकेंद्राचे स्वतंत्र विद्यापिठात रुपांतर करावे अशी मागणी मागील काही काळापासून पुढे आली आहे. माजी कुलगुरू बी.ए. चोपडे यांच्या कार्यकाळात व्यवस्थापन सदस्य संजय निंबाळकर यांनी हा ठराव मांडला. त्यानंतर सभेत ठराव पास होऊन पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे गेला आहे. मात्र, आंबेडकरी संघटनांनी यास विरोध करत विद्यापीठाचे विभाजन म्हणजे नामांतर लढ्यातील बलिदानाचा अवमान ठरेल अशी भूमिका घेतली आहे.
दरम्यान, विद्यापीठ विभाजन करून उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठाची मागणी सातत्याने लावून धरणारे व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबळकर आज विद्यापीठात सभेच्या निमित्ताने आले होते. यावेळी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम यांनी बैठकीस आलेल्या संजय निंबळकर यांना जाब विचारत विभाजनास विरोध दर्शवला. यानंतर निकम यांनी अचानक निंबळकर यांच्यावर शाईफेक केली. विद्यापीठ सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करून निकम यांना ताब्यात घेतले. यावेळी वेळी गुणरत्न सोनवणे, पवन पवार, मनीष नरवडे, सचिन गायकवाड, राहुल वडमारे आदींनी विद्यापीठ विभाजनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.
नामांतर बलिदानाचा अवमान ठरेल
विद्यापीठाचे विभाजन करून नामांतर शहिदांच्या बलिदानाचा अवमान करण्याचा हा प्रयत्न आहे. यातून राज्यात दंगली पेटविण्याचे कारस्थान आहे. विद्यापीठ विभाजनास आमचा तीव्र विरोध असेल.
- सचिन निकम, रिपब्लिकन विद्यार्थी सेना
जुनी मागणी आहे
विद्यापीठाचे विभाजन करणे हे शासनाचे काम आहे. कुठल्याही दबावाला बळी न पडता मी माझे काम यापुढेही करत राहील. या प्रकरणाची तक्रार विद्यापीठ करेल.
- संजय निंबळकर, सदस्य, व्यवस्थापन परिषद