ऊसतोडीच्या पैशासाठी मुकादमाने डांबून ठेवलेल्या मजुरांच्या सहा मुलांची सुटका
By शिरीष शिंदे | Published: June 14, 2023 07:27 PM2023-06-14T19:27:16+5:302023-06-14T19:27:35+5:30
जिल्हा बाल कल्याण समितीने केले आई-वडिलांकडे सुपुर्द
बीड : ऊसतोडीच्या उचलीचे पैसे शिल्लक राहिल्याचा दावा करत एका मुकादमाने बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या सहा मुलांना कुंभेज (जि. सोलापूर) येथे डांबून ठेवले होते. करमाळा पोलिसांच्या मदतीने त्या सहा मुलांची सुटका करण्यात आली. बीडमध्ये आणल्यानंतर त्या सहा मुलांना जिल्हा बाल समिती सदस्यांनी कुटुंबीयांकडे बुधवारी सुपुर्द केले.
केज तालुक्यातील शिंदी येथील एक कुटुंब व गेवराई तालुक्यातील दोन कुटुंबे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे ऊसतोडणीसाठी गेले होते. ऊसतोडणीचा हंगाम पूर्ण झाल्यानंतर करमाळा येथील एका ऊसतोड मुकादमाने मजुरांकडे पैसे शिल्लक असल्याचे म्हणत आणखी तीन महिने काम करावे लागेल, असे सांगितले. त्यानुसार बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांनी तीन महिने काम केले; परंतु अद्यापही पैसे शिल्लक असल्याचा दावा मुकादमाने केला. पैसे द्या; अन्यथा तुमची मुले आमच्याकडे ठेवा, असे सांगत त्या ऊसतोड मुकादमाने तीन मुले व तीन मुली करमाळा तालुक्यातील कुंभेज येथे डांबून ठेवल्या.
दरम्यान, शांताबाई वसंत माळी यांनी सोलापूर येथील चाइल्ड लाइनला मुले डांबून ठेवल्याची माहिती दिली. त्यावरून चाइल्ड लाइनने ही माहिती सोलापूरच्या बाल कल्याण समितीला कळवली. समितीने करमाळा पोलिसांना याची माहिती देत त्या बालकांची सुटका करण्याचे आदेशित केले. महिला पोलिस हवालदार पांढरे यांनी बालकांची सुटका करून सोलापूर बाल कल्याण समितीपुढे सादर केले. तेथून केज येथील अमर पाटील यांनी त्या मुलांना बीडमध्ये आणले. त्यानंतर बालकांना आई-वडिलांकडे सुपुर्द केले. यावेळी बीड जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे, सदस्य सुरेश राजहंस, प्रा. छाया गडगे, ॲड. संतोष वारे उपस्थित होते.