राखीव प्रवर्गातील सदस्य अडचणीत
By Admin | Published: March 20, 2016 11:35 PM2016-03-20T23:35:27+5:302016-03-20T23:40:11+5:30
परभणी :जातवैधता प्रमाणपत्रासंदर्भात ग्रामविकास विभागाने पत्र पाठविल्यानंतर जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांकडून जातवैधता प्रमाणपत्र दाखल करणाऱ्या उमेदवारांची माहिती मागविली आहे़
परभणी : ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागांवर विजयी झालेल्या उमेदवारांच्या जातवैधता प्रमाणपत्रासंदर्भात ग्रामविकास विभागाने पत्र पाठविल्यानंतर जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांकडून जातवैधता प्रमाणपत्र दाखल करणाऱ्या उमेदवारांची माहिती मागविली आहे़ त्यामुळे अद्यापपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र दाखल न केलेल्या सदस्यांच्या अडचणीत भर पडली आहे़
जिल्ह्यात एप्रिल ते जून २०१५ आणि आॅगस्ट ते सप्टेंबर २०१५ या काळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक दोन टप्प्यात पार पडली होती़ या निवडणुकीमध्ये राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले होते़ अनेकांनी जात प्रमाणपत्राची पडतळाणी केली नसल्याने या उमेदवारांना निवडणूक लढविताना जातवैधता प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी अर्ज दाखल केल्याची पावती जोडून निवडणूक लढविण्याची मुभा दिली होती़ मात्र राखीव जागेवर विजयी झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र दाखल करणे बंधनकारक केले होते़ हा कालावधी आता संपला आहे़ त्यामुळे राखीव जागांवरून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे क्रमप्राप्त झाले आहे़ जिल्ह्यातील अनेक विजयी उमेदवारांनी अद्याप असे प्रमाणपत्र दाखल केले नाही़ मध्यंतरी निवडणूक विभागाने राखीव प्रवर्गातील सदस्यांना नोटीस बजावून लेखी म्हणणे मागविले होते़ अनेक सदस्यांनी आपले म्हणणे तहसीलच्या निवडणूक विभागाकडे दाखल केले. मात्र १८ फेब्रुवारी रोजी ग्रामविकास व जलसंधारण विभागाने एक आदेश काढून विहित मुदतीत जात प्रमाणपत्र सादर करण्याचे कळविले आहे़ त्यानुसार राखीव प्रवर्गातून विजयी झालेल्या उमेदवारांनी सहा महिन्यांच्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास कसूर केल्यास त्या व्यक्तीची निवड भुतलक्षी प्रभावाने रद्द झाली असल्याचे मानण्यात येईल आणि ती व्यक्ती सदस्य राहण्यास अपात्र ठरेल, असे कळविले आहे़ त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न करणाऱ्या सदस्य, सरपंचाची नावे गटविकास अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावीत, असे आदेश महाराष्ट्र शासनाचे उपसचिव गिरीष भालेराव यांनी काढले आहेत़ १८ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या या आदेशामुळे जात वैधता प्रमाणपत्र अद्यापही सादर न केलेल्या सदस्यांच्या अडचणीत भर पडली आहे़ (प्रतिनिधी)
दोन वेळा पाठविले स्मरणपत्र
परभणी तहसील कार्यालयाने गटविकास अधिकाऱ्यांना ११ मार्च रोजी पत्र दिले असून, तालुक्यातील ९३ ग्रामपंचायतींमधील राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविलेल्या किती सदस्यांनी जात पडताळणी सादर केली आहे व किती सदस्यांची जात पडताळणी सादर करणे बाकी आहे? याचा अहवाल सात दिवसांत कळवावा, असे सूचित केले आहे़ मात्र सात दिवसांचा कालावधी उलटूनही गटविकास अधिकारी कार्यालयाकडून अद्याप ही माहिती पुरविण्यात आली नसल्याने १६ मार्च रोजी तहसील कार्यालयाकडून गटविकास अधिकाऱ्यांना स्मरणपत्र देण्यात आले आहे़ त्यामुळे किती उमेदवारांनी अद्याप जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही, याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही़
परभणी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जात पडतळाणी समितीकडे अर्ज केले आहे़ परंतु, या समितीकडून अद्याप सदस्यांना जातवैधता प्रमाणपत्र मिळालेले नाही़
अनेक सदस्यांचे जातवैधता प्रकरणे पडताळणी समितीकडेच प्रलंबित असल्याने हे सदस्य अद्यापपर्यंत जातवैधता प्रमाणपत्र दाखल करू शकले नाहीत़ यात सदस्यांचा कुठलाही दोष नसल्याने या सदस्यांना जातवैधता प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी कालावधी वाढवून देण्याची मागणी होत आहे़