सुविधा, संशोधनासाठी राज्यातील २१ शैक्षणिक संस्थांना ७८४ कोटी रुपये मिळणार
By राम शिनगारे | Published: February 19, 2024 12:53 PM2024-02-19T12:53:44+5:302024-02-19T12:54:31+5:30
११ सार्वजनिक विद्यापीठे, सहा महाविद्यालये अन् चार क्लस्टर विद्यापीठांचा समावेश
छत्रपती संभाजीनगर : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पायाभूत सुविधांची निर्मिती आणि संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने देशभरातील २२२ शिक्षण संस्थांना ४ हजार ४७६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यात महाराष्ट्रातील ११ सार्वजनिक विद्यापीठे, सहा मॉडेल कॉलेज, नव्याने स्थापन झालेल्या चार क्लस्टर विद्यापीठ अशा एकूण २१ संस्थांना ७८४ काेटी रुपये मंजूर केले आहेत. हा निधी संबंधित संस्थांना तीन वर्षांमध्ये खर्च करणे अपेक्षित आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयात देशभरातील शैक्षणिक संस्था, विद्यापीठांकडून पीएम-उषा योजनेंतर्गत पायाभूत सुविधा आणि संशोधनासाठी मागीलवर्षी प्रस्ताव मागवले हाेते. देशभरातून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील उच्च शिक्षण विभागातील प्रोजेक्ट ॲप्रूव्हल बोर्डाने (पीएबी) मागील महिन्यात बैठक घेतली. त्या बैठकीत देशभरातील विद्यापीठांसह शैक्षणिक संस्थांच्या प्रस्तावांची छाननी केल्यानंतर २२२ संस्थांना ४ हजार ४७६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. येत्या आठ दिवसात त्यातील पहिल्या टप्प्यातील अनुदान संबंधित संस्थांना प्राप्त होणार आहे.
महाराष्ट्रातील २१ संस्थांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला प्रत्येक १०० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. त्याशिवाय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठ, मुंबई, मुंबई विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडला प्रत्येकी २० कोटी मंजूर केले आहेत. तसेच जालना, गडचिरोली, बुलढाणा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील मॉडेल कॉलेजला प्रत्येकी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून पायाभूत सुविधांच्या निर्मितीसह संशोधनाला चालना मिळणार आहे.
क्लस्टर विद्यापीठांना प्राधान्य
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात क्लस्टर विद्यापीठांना प्राधान्य देण्यात आले आहे. या धोरणानुसार राज्यात नव्याने मंजूर झालेल्या होमी भाभा क्लस्टर विद्यापीठ, मुंबई, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा, हैदराबाद (सिंड) नॅशनल कॉलेज क्लस्टर विद्यापीठ, मुंबई आणि स्वतंत्र विद्यापीठ बनलेल्या फर्ग्युसन महाविद्यालयाला प्रत्येकी ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते उद्या उद्घाटन
पीएम-उषा योजनेत २२२ शिक्षण संस्था, विद्यापीठांना ४ हजार ४७६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन मंगळवारी सकाळी ११ वाजता दिल्लीत होत आहे. त्यात देशभरातील निधी मंजूर झालेल्या संस्था दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.