काॅर्पोरेट क्षेत्रातील संधीमुळे विद्यापीठात वाढले मानव्य विद्याशाखेत संशोधक
By योगेश पायघन | Published: January 31, 2023 06:27 AM2023-01-31T06:27:49+5:302023-01-31T06:30:02+5:30
मानव्य विद्याशाखेत ४३.५६ टक्के, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेत ३२.४ टक्के संशोधक विद्यार्थी
- योगेश पायघन
औरंगाबाद : बदलते शैक्षणिक धोरण, फेलोशिपचे आर्थिक पाठबळ, मार्गदर्शकांची वाढलेली संख्या आणि काॅर्पोरेट क्षेत्रात गुणवत्तेच्या संशोधनाला निर्माण झाल्याने मानव्य विद्या शाखेत संशोधकांचा आलेख लक्षणीय उंचावला आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सध्या ७,७४४ विद्यार्थ्यांचे पीएच.डी संशोधनासाठी सध्या नोंदणी आहे. त्यापैकी तब्बल ३,३७४ अर्थात ४३.५६ टक्के संशोधकांची नोंदणी मानव्य विद्या शाखेतील आहे.
पदव्युत्तर पदवीनंतर पीएच.डी केल्यावर केवळ अध्यापन नव्हे, तर खासगी, संशोधन आणि सेवा क्षेत्रात करिअरच्या संधी संशोधनकर्त्यांना उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे विज्ञान व तंत्रज्ञान शाखेत सर्वाधिक असलेले संशोधकांची संख्या होती. मात्र, गेल्या दहा वर्षांत हे चित्र हळूहळू बदलल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. याविषयी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डाॅ.पी.व्ही. देशमुख म्हणाले, विविध फेलोशिपचे पाठबळ, काॅर्पोरेट सेक्टरमधील संधी, स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचा मानव्य विद्या शाखेतून विविध विषयांत संशोधनाकडे वाढता कल दिसत आहे.
१९६२ ते २००९ पर्यंत ३,०९४ जणांनी संशोधन पूर्ण केले. त्यात सर्वाधिक संशोधन हे विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतील आहेत. २००९ ते २०२२ पर्यंत ४ हजार ४,४६० जणांनी संशोधन पूर्ण केले. त्यात मानव्य विद्या शाखेतील विषयातील संशोधन वाढलेले दिसते, तर नव्याने नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांचाही कल या शाखेत वाढलेला आकडेवारीवरून स्पष्ट होतो. शहरात ५८ तर जिल्ह्यात ९३ संशोधन केंद्रे आहेत. त्यापैकी ४४ केंद्र विद्यापीठातील विभागात आहेत. बीडमध्ये ४१, जानला येथे ३०, उस्मानाबाद येथे १४ अशा १७८ संशोधन केंद्रांवर सध्या संशोधन सुरू आहे. देशात सर्वाधिक संशोधक विद्यापीठात संशोधन करत असून, ही वाढती संख्या लक्षात घेऊन कालमर्यादेत संशोधन प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी कुलगुरू डाॅ.प्रमोद येवले यांनी साॅफ्टवेअर युनिककडून विकसित करून घेतले. प्रत्येक टप्प्यावरील संशोधनाची अपडेट स्थिती त्याद्वारे घेतली जात आहे. विद्यापीठाने आता सर्व संशोधक विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य केली आहे. मात्र, अनेक जण बायोमेट्रिकमुळे अर्थवेळ संशोधक होण्याच्या प्रयत्नात असल्याचे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
मार्गदर्शक, जागा वाढल्या...
पूर्वीपेक्षा पीएच.डी मार्गदर्शकांची संख्या वाढली, त्यामुळे जागा वाढल्या. याशिवाय विद्यार्थ्यांचा मानव्य विद्या शाखेत पीएच.डीकडे कल वाढला असून, शासकीय पाठबळ मिळाल्याने संशोधक वाढले आहेत. गुणवत्तापूर्ण समाजोपयोगी संशोधनाला अध्यापनच नव्हे, तर इतर खासगी, सेवा क्षेत्रांत संधी असल्याने हे चित्र बदलत आहे.
- डाॅ.श्याम शिरसाठ, प्र कुलगुरू डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.
पीएच.डी संशोधनाची मानव्य विद्या शाखेतील स्थिती
विषय - गाइड - जागा - पीएच.डी नोंदणी - रिक्त जागा
अर्थशास्त्र -८१ -४७२ -२७५ -२०२
इतिहास -८३ -४५० -३२५ -१४६
मराठी -१२० -७१८ -५०९ -२४९
इंग्रजी -१०७ -५५४ - ४७२ -१२९
भूगोल -६९ -३१६ -१९१ -१३६
हिंदी -११७ -६७२ -२६९ -४०३
विधि -१६ -९४ -६१ -३६
संस्कृत -३ -२० -१८ -२
उर्दू -१५ -७४ -५९ -१८
अरेबिक -४ -१४ -७ -७
पाली ॲण्ड बुद्धिझम -१ -४ -५ -०
राज्यशास्त्र -७१ -४०२ -३०५ -१०६
समाजशास्त्र -५८ -३०० -१९० -१२०
मानसशास्त्र -३० -१४२ -८९ -५८
पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन -४३ -२१८ -८७ -१३३
(स्रोत : युनिक पोर्टल)
अशी आहे पीएच.डी. नोंदणी
शाखा -नोंदणी -पूर्णवेळ -अर्धवेळ
विज्ञान व तंत्रज्ञान -२५०९ -१५६९ -९४०
आंतरविद्याशाखीय अभ्यास - ११४४ -७७१ -३७३
मानव्यविद्या - ३३७४ -२४८८ -८८६
वाणिज्य व व्यवस्थापन -७१७ -५२८ -१८९