१६३४ रूग्णांना दिले नवजीवन
By Admin | Published: July 30, 2014 12:07 AM2014-07-30T00:07:52+5:302014-07-30T01:03:37+5:30
हिंगोली : अतिशय गंभीर आणि दुर्धर आजारांवर एक रूपयाही खर्च न करता उपचार मिळाल्यामुळे जिल्ह्यातील १ हजार ६३४ रूग्णांसाठी राजीव गांधी जीवनदायी योजना
हिंगोली : अतिशय गंभीर आणि दुर्धर आजारांवर एक रूपयाही खर्च न करता उपचार मिळाल्यामुळे जिल्ह्यातील १ हजार ६३४ रूग्णांसाठी राजीव गांधी जीवनदायी योजना खऱ्या अर्थाने जीवनदायीनी ठरली. प्रामुख्याने जीवघेण्या आजारांपैैकी कॅन्सर तसेच किडनीच्या विकारांवर उपचार घेतलेल्यांंची संख्या सर्वाधिक आहे. केवळ आठ महिन्यांत औरंगाबाद, नांदेड, अहमदनगर, मुंबईतील कॉर्पोरेट रुग्णालयात रुग्णांनी ३ कोटी ९७ लाख ७२ हजारांचा उपचार घेतला.
दिवसेंदिवस आजारांचे प्रमाण वाढत असताना आरोग्याच्या सुविधा अपुऱ्या पडतात. जुनाट आजारांच्या उपचारांसाठी लागणारा भरमसाठ पैसे सामान्यांकडे नसतो. पैशांअभावी अनेकांचा बळी गेल्याने राज्य शासनाने २२ नोव्हेंबर रोजी या योजनेचा विस्तार केला. त्यात पिवळे, केशरी रेशनकार्ड आणि अंत्योदय तसेच अन्नपूर्णा योजनेच्या कार्डधारकांना मोफत उपचाराची सुविधा दिली. म्हणून लाभधारकांना ९७१ प्रकारच्या आजारांवर शस्त्रक्रिया तसेच उपचार मिळू लागला. त्याचा लाभ हिंगोली जिल्ह्यातील साडेसोळाशे रूग्णांनी घेतला. आजघडीला सर्वात घातक असलेल्या हाडाचा कॅन्सर, रक्ताचा, स्तनाचा, तोंडाचा आणि गर्भाशयाच्या कर्करोगावर ३८३ रूग्णांनी शत्रक्रियेचा लाभ घेतला. औषधींवर भागत असल्यामुळे कॅन्सरच्या ८७ रूग्णांनी किरणोत्सारी उपचारास पसंती दिली. नाजूक किडनीच्या गंभीर आजारांवर उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या २१९ होती. हृदयविकारासाठी यापूर्वी परजिल्हा गाठावा लागत असल्यामुळे उपचाराची रक्कम लाखांच्या घरात जायची. जीवनदायीमुळे विनाखर्चात परजिल्ह्यात १५३ जणांनी शस्त्रक्रिया तर १७० रुग्णांनी औषधोपचार घेतला. मेंदूतील रक्ताची गाठ, कॅन्सर आदी गंभीर आजारांवर ३६ गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया झाल्या. जन्मत: व्यंग, संडास तसेच लघवीची जागा नसणे, अन्ननलिका नसलेले, हार्निया आणि हृदयाच्या आजारांवर २८ बालकांनी उपचार घेतला. शिवाय जळालेले रुग्ण, कान-नाक-घसा, अपघातातील जखमी रुग्णांनाही उपचार घेतल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक हेमंतकुमार बोरसे यांनी सांगितले. ऐपत नसताना समाविष्ट मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात उपचाराच्या तरतुदीमुळे ही योजना रूग्णांना नवजीवन देणारी ठरली आहे. (प्रतिनिधी)
तारखेची कटकट संपली
९८ रूग्णांनी३१ मार्च २०१३ पूर्वीच्याच रेशनकार्डधारकांना लाभ मिळत असल्याने नव्याने कार्ड मिळालेल्या लाभधारकांची अडचण होती. लग्नानंतर झालेल्या मुलांचे नाव देखील कार्डावर नसल्याने त्यांना लाभापासून वंचित राहावे लागत होते. दोन्हींची संख्या अधिक असल्याने नुकत्याच दोन्ही अटी शिथिल केल्या. आता कोणत्याही तारखेचे कार्ड चालते. नुकत्याच जन्मलेल्या आणि ६ वर्षांखालील बालकांना वडिलांचे ओळखपत्र आणि जन्म दाखला पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात असल्याचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम यांनी सांगितले.
जिल्ह्यातील स्थिती
हिंगोलीतील सामान्य रुग्णालयात १६ रुग्णांनी ९१ हजारांचा उपचार घेतला. वियायक आयसीयूमध्ये ९८ रूग्णांनी१७ लाख ८८ हजारांचा उपचार घेतला. टेहरे हॉस्पिटलमध्ये ८ तर माधव मल्टिस्पेशालिटी इस्पितळात उपचार घेणाऱ्यांची संख्या १६९ आहे. उपचाराची ३४ लाख ९८ हजारांची रक्कम शासनाने दिली.